मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची सध्या ईडी चौकशी सुरू आहे. आज सकाळी साधारण ११ वाजल्यापासून अनिल देशमुखांशी निगडित असलेल्या खंडणी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ईडीकडून आत्तापर्यंत दोन वेळा कुंटे यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

ईडीच्या सूत्रांनी सांगितलं होतं की अनिल देशमुख जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि त्यावेळी ज्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती झाली होती, त्याच आधारावर कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ईडीने याआधी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. ईडीने सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा – अनिल देशमुखांच्या पत्नी आरती देशमुखांची मुंबई हायकोर्टात धाव; जाणून घ्या कारण

देशमुख यांच्यावर माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं आणि हे पैसे मुंबईतल्या बार आणि रेस्तराँच्या मालकांकडून गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याशिवाय, ही तपास यंत्रणा तत्कालीन राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये गुंतलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करत आहे. या अहवालात फोन टॅपिंग देखील जोडले गेले होते, ज्याने दलाल आणि इतर यांच्यातील संबंध उघड केले होते.

रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना अहवाल सादर केला. त्यानंतर जयस्वाल यांनी हा अहवाल गृहविभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव कुंटे यांच्याकडे पाठवला, जेणेकरून या अहवालाच्या आधारे काय कारवाई करावी, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करता येईल. या अहवालावर सरकारने कार्यवाही केली नाही, असा आरोप आहे, त्यानंतर शुक्ला आणि जयस्वाल यांनी केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीचा पर्याय निवडला.