नागपूर / पुणे / छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन देशाबाहेर गेल्यानंतर तेथे सत्तांतर होऊ घातले आहे. त्यामुळे भारताबरोबरचा व्यापार ठप्प झाला असून अनेक कंटेनर सीमेवर अडकून पडले आहेत. विदर्भातील संत्री, रुईच्या गाठींसह अन्य साहित्याची निर्यात ठप्प आहे. डाळिंब उत्पादकांचेही दररोज सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान होत असून हिरव्या मिरचीची १०० ट्रक निर्यातही बंद पडली आहे.

विदर्भातील कंटेनर सीमेवर अडले

विदर्भातून बांगलादेशमध्ये वर्षाकाठी ३१०० कोटींच्या वस्तूंची निर्यात होत असल्याची माहिती विदेशी व्यापार विभागाच्या साहाय्यक महासंचालक स्नेहल ढोके यांनी दिली. संत्री, रुईच्या गाठी, सिरॅमिक टाइल्स, अभियांत्रिकी उपकरणे, औषधी व काही रसायनांचा यात समावेश आहे. अनेक व्यापाऱ्यांनी बांगलादेशच्या उद्याोजकांशी कच्चामाल पुरवठ्याचे करारही केले आहेत. मात्र राजकीय अस्थिरतेमुळे सीमा बंद असल्याने या वस्तू घेऊन गेलेले कंटेनर्स अडकून पडले आहेत.

हेही वाचा >>> ‘लॉजिस्टिक धोरणा’द्वारे पाच लाख नोकऱ्या; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मिरची उत्पादकांना मोठी झळ

बांगलादेशला हिरव्या मिरच्यांची निर्यात थांबल्याने दररोज सुमारे १०० ट्रकची मागणी अचानक थांबली आहे. (पान १० वर) (पान १ वरून) त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत दर अर्ध्यावर आल्यामुळे मिरची उत्पादक हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात कन्नड, सिल्लोड, जालन्यातील भोकरदन-जाफराबादमध्ये मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथील माल पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात पाठवला जातो. गेल्या महिन्यापर्यंत शंभर-शंभर ट्रक मिरची पाठवली जायची. मात्र, महिनाभरापासून ही मागणी एकदम थांबली आहे. मधल्या काळात बांगलादेशमधील परिस्थिती निवळल्यानंतर मागणीही थोडी वाढली. मात्र तेथील राजवट उलथविण्यात आल्याने निर्यात पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.

हेही वाचा >>> सोलापूर: मंडल अधिकारी, तलाठ्याविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा

डाळींब उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान

राज्यातून दररोज २०० ते २५० टन डाळिंब बांगलादेशला निर्यात होत होती. त्याला १०० ते १४० रुपये किलो दर मिळत होता. मात्र तीन दिवसांपासून निर्यात पूर्णपणे बंद असल्याने उत्पादकांना दररोज अडीच कोटींचा फटका बसत असल्याचे अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी सांगितले. देशातून अथवा राज्यातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ७० टक्के निर्यात एकट्या बांगलादेशात होते. इंदापूर, फलटण, सांगोला, आटपाडी, सोलापूर, नाशिक आणि उस्मानाबादच्या डाळिंब उत्पादकांना निर्यात थांबल्याचा सर्वाधिक बसत आहे. मात्र बांगलादेशची मोठी भिस्त आयात मालावर असल्यामुळे सीमा लवकरच खुल्या होतील, अशी अपेक्षा चांदणे यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी वस्तू घेऊन गेलेले कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. ट्रकचालकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. – प्यारे खान, सिरॅमिक टाइल्स, अभियांत्रिकी उपकरणांचे निर्यातदार

बांगलादेशला निर्यात बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी डाळिंबाची काढणी थांबवली असून ती जास्तीत जास्त आठ दिवस लांबविता येईल. निर्यात सुरळीत होण्यासाठी केंद्राने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. – दत्तात्रय येलपले, डाळिंब उत्पादक

गतवर्षी सव्वाशे रुपये किलोपर्यंत दर मिळू लागल्याने यंदा क्षेत्र तिप्पट वाढले. गतवर्षीएवढा नसला तरी ५० ते ६० रुपये दर मिळत होता. आता ठोक विक्रीच्या व्यवहारात दर २० ते २५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. – संजय काळे, मिरची उत्पादक