कोल्हापूर/नवी मुंबई/सांगली : पश्चिम आशियात युद्धाची व्याप्ती वाढल्याने त्याचा परिणाम भारतीय व्यापारावर होऊ लागला आहे. विशेषत: महाराष्ट्रातून आखाती देशांत होणारी साखर, कांदा, तांदूळ, द्राक्षे या मालाची निर्यात सध्यात पूर्णपणे थांबली आहे. कांदा आणि द्राक्षे यांचे हजारो टन मालाचे कंटेनर नवी मुंबईतील ‘जेएनपीए’ बंदरात पडून असल्याने तो माल सडून जाण्याची भीती आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणकडून अमेरिकेची मित्र राष्ट्रे असलेल्या अन्य आखाती देशांवर हल्ले केले जात असल्याने या राष्ट्रांची विमान तसेच जलवाहतूक थांबली आहे. हे युद्ध लांबण्याची चिन्हे असतानाच आतापासूनच भारतीय मालाला त्याच्या झळा बसू लागल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका द्राक्षे आणि कांदा या मालाला बसला आहे. दुबई येथील प्रमुख बाजारपेठ तात्पुरती बंद करण्यात आल्याने कांद्याची निर्यात थांबली आहे. परिणामी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे १५०हून अधिक कंटेनर अडकून पडले आहेत.
रमजानच्या महिन्यात आखाती देशात मोठ्या प्रमाणात द्राक्षे, डाळिंब, केळी, ड्रॅगन फ्रूट, कलिंगडे निर्यात केली जातात. सांगली जिल्ह्यातून व्यापारी जागेवर द्राक्ष खरेदी करून दुबईमार्गे आखाती देशात पाठवतात. दुबईला पाठविण्यात येत असलेले द्राक्षाचे ३०० कंटेनर (जवळपास ३९०० टन माल) जहाजात चढविण्यात आली होती. मात्र, आता तो माल परत पाठविण्यात येत असून, सुमारे ७०० कंटेनर माल अद्याप बंदरातील शीतगृहात पडून आहे. स्थानिक पातळीवर शेतकर्यांकडून १२० ते १७० रुपये दराने ही द्राक्षे व्यापार्यांनी खरेदी केली होती. आता स्थानिक बाजारातच हा माल कमी दरांत खपवावा लागणार आहे.
युद्धाचा मोठा फटका साखर निर्यातीला बसणार आहे. केंद्र सरकार दरवर्षी वर्षी निर्यात कोटा जाहीर करीत असते. सरकारने यंदाच्या हंगामात २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी ५ लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.साखरेच्या आयातदारांमध्ये इराण प्रमुख आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने निर्बंध शिथिल केल्यानंतर इराणला भारताने दीड लाख टन कच्ची साखर निर्यात केली होती. मार्च २०२५ मध्ये भारताने ४०५ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीची साखर संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान, इराण, ताजिकीस्तान आदी देशांना निर्यात केली होती. युद्ध आणखी काळ सुरू राहिल्यास साखर निर्यात आणखी रोडावण्याची शक्यता आहे.
शिरखुम्र्याची चिंता
देशातून २०२४ मध्ये १.२५ अब्ज डॉलर किमतीचा बासमती तांदूळ, पशुखाद्य, कॉफी, चहा, फळे, औषधे इराणला निर्यात केली होती. त्यात बासमती तांदळाचे प्रमाण (६० हजार टन) सर्वाधिक होते. आता साखर आणि बासमती यांची निर्यात धोक्यात आल्याने इराणसह आखाती देशांत रमजानमध्ये शिरखुर्मा तयार करण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून मंत्री गटाची स्थापना
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने मंत्री गटाची स्थापना केल्याचे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केेले. तणाव वाढल्याने निर्यातदारांनी चिंता व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर हा गट आयात-निर्यात तसेच अन्य बाबींचा दैनंदिन आढावा घेईल, असे गोयल यांनी नमूद केले. पहिल्याच बैठकीत विविध मंत्र्यांनी सूचना केल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
युद्धामुळे द्राक्षनिर्यात थांबली असून, त्याचा फटका बंदरात असलेल्या ५ ते ६ हजार टन द्राक्षाला बसणार आहे. अद्याप बागेत १० हजार टन निर्यातक्षम द्राक्षे असून, बाजारातील दरातच ही द्राक्षे विकावी लागणार आहेत. – मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
जहाजमार्गे वाहतूक होणे कठीण आहे. विमान वाहतुकीवर निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत इराणसह आखाती देशांना साखर निर्यात होण्याची शक्यता कमी आहे. – पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ
जेएनपीए बंदरात अडकलेला कांदा निर्यात न झाल्यास पुन्हा बाजारात येईल. बाजारात उपलब्ध कांदा आणि बंदरातून परतलेला कांद्यामुळे बाजारातील एकूण साठा वाढून कांद्याचे दर घसरतील. – सुनील अडसूळ, कांदा व्यापारी, मुंबई एपीएमसी
