मध्य प्रदेशमधील भाजप सरकार २४ तास वीजपुरवठा करत आहे. तथापि, महाराष्ट्रात जेव्हापासून काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून वीज भारनियमन सुरू झाले, असे टीकास्त्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोडले. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ रावेर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पूर्वी महाराष्ट्र हे देशाचे इंजिन होते. देशात पहिला क्रमांक महाराष्ट्राचा लागायचा. आता मात्र मध्य प्रदेश, गुजरात यांच्या मागे महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्यास काँग्रेस सरकार कारणीभूत असल्याचा आरोपही चौहान यांनी केला. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात रस्त्यांची चाळण झाली होती. आता महाराष्ट्रातील रस्त्यांची तीच अवस्था झाली. महाराष्ट्रातील बरेच वीज संच कोळशाअभावी बंद पडले आहेत. मग मध्य प्रदेशला कोळसा कसा मिळतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राकडे कोळसा विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. मध्य प्रदेशमध्ये आम्ही नियमित पैसे भरून कोळसा घेतो म्हणून २४ तास वीज देतो, असेही त्यांनी नमूद केले. गतवर्षी गारपीट व चक्री वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मध्य प्रदेशने तीन हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. तसेच २१२७ कोटी रुपये कृषी पीक विम्यातून नुकसान भरपाई देण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध आहे. शिक्षणासाठी सर्वाना शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षणासाठी दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठीची हमी सरकार घेणार आहे. या शिवाय, अनेक कल्याणकारी योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू असून महाराष्ट्रात भाजप सरकार आल्यास येथेही या सर्व योजना सुरू केल्या जाणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.