अहिल्यानगर: राज्य सरकारच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील निकषानुसार दोन लाखांची कर्जममाफी मिळणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी व ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. यापूर्वीच्या सन २०१९ मध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना केवळ ५० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी मोठ्या संख्येने दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे निकष राज्य सरकारने आदेशाद्वारे जाहीर केले. त्यानुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असणार्‍या पात्र शेतकर्‍यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकर्‍यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

योजना जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत व खासगी बॅकांकडून माहिती मागविली होती. त्यानुसार अहिल्यानगर जिल्हा बँकेचे २ लाख ७४ हजार ५३२ थकबाकीदार व या खातेदारांकडे ३३८१ कोटी रुपये थकबाकी आहे. सर्वाधिक खातेदार श्रीगोंदे तालुक्यात ६४ हजार ७५३ व त्यांच्याकडे ९३५ कोटींची थकबाकी, त्याखालोखाल नेवासा तालुक्यात ३९ हजार ८२६ खातेदारांकडे ५२४ कोटींची थकबाकी आहे. सर्वात कमी कोपरगाव तालुक्यात ५ हजार २२५ खातेदारांकडे ६१ कोटींची थकबाकी आहे. तर नियमित परतफेड करणार्‍या सभासदांची संख्या ६ लाख १ हजार १४० असून त्यांची रक्कम ६५३८ कोटी २२ लाख रुपये आहे.

सन २०१९ मधील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या तुलनेत यंदाच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. सन २०१९ मधील योजनेचा लाभ मिळणार्‍या शेतकर्‍यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये केवळ ५० हजार रुपये मिळणार आहेत व ते २ लाखापर्यंत कर्जमुक्तीला पात्र ठरणार नाहीत. त्यांनी थकबाकीची रक्कम भरल्यानंतर त्या खातेदाराला ५० हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे यंदाच्या कर्जमुक्ती योजनेत २ लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी मिळणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे.

यंदाच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत ३१ मार्च २०१७ पर्यंत २ लाख कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. तसेच एकासह अनेक बँकेची परतफेड असली तरी एकत्रित २ लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. तीही उर्वरित रक्कम जमा केल्यानंतर दिली जाणार आहे. सन २०१९ मधील योजनेत जिल्हा सहकारी बँकेचे २ लाख ५१ हजार १७ खातेदार होते. त्यांना १४११ कोटींची कर्जमाफी मिळाली. त्यामुळे या २ लाख ५१ हजार १७ शेतकर्‍यांना ५० हजार रुपये मिळणार आहेत. ते २ लाखपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत.