मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी सोमवारी सहकार विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आज अखेर २४ लाख ६७ हजार लाभार्थी शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे.

कर्जमाफी योजनेसाठी महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर बँकांनी ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती सादर केली होती. पहिल्या यादीमध्ये १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. ४ लाख २० हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. आज ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी आज प्रसिद्ध झाली. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेतील कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

कर्जमाफी पात्र लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मार्च २०२६ अखेर रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या ‘आपले सेवा’ केंद्रावर जाऊन ‘आधार’ प्रमाणीकरण करावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची रक्कम २ लाखांपेक्षा जास्त असली तरी शासनाच्या धोरणानुसार सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत.

कोणत्या विभागात किती लाभार्थी?

तिसऱ्या यादीमध्ये अमरावती विभागात ८५ हजार ७६ शेतकरी पात्र ठरले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ लाख ६४५०, कोकण विभागात २ हजार ७५६, नागपूर विभागात ३० हजार ७३८, नाशिक विभागात १४ हजार २४४ आणि पुणे विभागात ११ हजार ९२८ शेतकरी पात्र ठरले आहेत.

कालावधीचा निकष काय?

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे यात समाविष्ट आहेत. २ लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जांसह पुनर्गठित कर्जांचा यामध्ये समावेश आहे.

लाभार्थीसाठी सूचना :

1.तिसऱ्या यादीमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा निहाय यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

2. कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण करावेया यादीतील शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार नमूद करण्यात आली आहे.

3. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.

4. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या यादीतील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक करण्यात येणार आहेत.

5. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतक-यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमीत करण्यात आलेली आहे. 6. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.