देशातील पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी ही १९८० मध्ये महाराष्ट्रात करण्यात आली होती. बॅ. अ. र. अंतुले मुख्यमंत्री असताना राज्यातील शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्यात आले होते.
आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी पाच वेळा कर्जमाफी योजना जाहीर
१) १९८० : शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ ( मुख्यमंत्री : अ. र. अंतुले)
२) २००८ : राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे कर्जमाफ – कर्जमाफीची रक्कम : ७१ हजार कोटी -( पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग)
३) २०१७-१८ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – कर्जमाफीची रक्कम : ३५ हजार कोटी – (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
४) २०१९-२- : महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – कर्जमाफीची रक्कम : २२ हजार कोटी (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
५) २०२६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमक्ती योजना – कर्जमाफीची रक्कम : ३६ हजार कोटी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
कर्जमाफीवरून बॅ. अंतुले यांनी रिझर्व्ह बँकेला ठणकावले
देशात शेतकऱ्यांसाठी पहिली कर्जमाफी योजना ही १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अ, र. अंतुले यांनी राज्यात राबविली होती. शेतकऱ्यांचे सुमारे १०० कोटींचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय अंतुले यांनी जाहीर केला होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेस रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेतला होता. अशी कर्जमाफी करता येणार नाही, असे पत्र रिझर्व्ह बँकेने राज्य सरकारला पाठविले होते. त्यावर बॅ. अंतुले यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत ‘रिझर्व्ह बँक म्हणजे सुपर सरकार नव्हे’ असे ठणकावले होते. कर्ज माफ केली तेवढी बँकांना मिळाली तर रिझर्व्ह बँकेचे बिघडले कुठे, असेही अंतुले यांनी स्पष्ट केले होते.
