राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून, पुरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील भागांची पाहणी करणार आहेत.

सातारा जिल्ह्यात दोन गावांमध्ये दरड कोसळून मोठी जीवित हानी झाली आहे. दोन्ही गावांमध्ये मदत व बचावकार्य सध्या चालू सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून, आंबेघर आणि मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या होत्या. या भागांना मुख्यमंत्री आज भेट देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.

सातारा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागांची मुख्यमंत्री हवाई पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल. सकाळी ११.४० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. या भेटीनंतर मुख्यमंत्री दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. दुपारी १.२५ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील.

असा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर-सातारा दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पुरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. कोल्हापूर भेटीपासून उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार होती, पण हेलिकॉप्टर उड्डाणामध्ये अडचणी आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथम सांगली जिल्ह्यातील पलूसच्या दिशेनं रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यानंतर दुपारनंतर कोल्हापूरला येणार आहेत. उपमुख्यमंत्री पलूस, शिरोळ या भागातील पुरग्रस्त परिसराची पाहणी करणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दिशेनं रवाना होणार आहेत. कोल्हापूरमधील शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट आणि शिवाजी पूल पूरग्रस्त परिसर पाहणी अजित पवार करणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठकही घेणार. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री साताऱ्याच्या दिशेनं रवाना होतील. सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक घेणार आहेत.