मुख्यमंत्र्यांकडून आढावा; मदतीबाबत लवकरच निर्णय

मुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या, पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि बाधितांना द्यावयाच्या मदतीचा प्रस्ताव लवकर सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि नुकसानीचा ठाकरे यांनी आढावा घेतला. नुकसानीबाबतची आकडेवारी आणि मदतीबाबत तपशीलवार वस्तुनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपद्ग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल, पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायिकांची माहिती एकत्र करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पूरग्रस्तांना दहा हजार रुपये रोख, पाच हजारांचे धान्य

सांगली : राज्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने दहा हजार रुपये रोखीने आणि पाच हजार धान्य स्वरूपात तातडीची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महापुराने जिल्हयातील ४१ हजार कुटुंबातील १ लाख ९७ हजार लोक विस्थापित झाले. पुराने विस्थापित झालेल्या प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची तातडीची मदत राज्य शासनाकडून देण्यात येईल. ही मदत बँक खात्यामार्फत दिली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द

वाई :  नुकसानीच्या पाहणीसाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सातारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र कोयनानगरला पावसाचा जोर वाढल्याने हेलिकॉप्टर उतरविण्यास हवामान अनुकूल नसल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.