Republic Day 26 January Parade: दिल्लीतील कर्तव्य पथावर उद्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जाईल. लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन, भारताच्या तीनही सेनांची चित्तथरारक संचलने, इतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि याचबरोबर देशवासियांना प्रमुख आकर्षण असणाऱ्या चित्ररथांचे सादरीकरण होईल. यंदा महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ हा ‘ गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे उद्या कर्तव्य पथावर ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष होणार आहे.

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. भारतात नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण संस्कृती, त्यांचे सण-उत्सव तेथील सामाजिक जीवन, लोकसंस्कृती, प्रमुख धार्मिक स्थळे आणि विविध विषयांवर हे चित्ररथ साकारले जातात. प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन या चित्ररथांच्या माध्यमातून देशवासियांना होत असते.

सजावट, कलाकारांचा सहभाग, वैशिट्यपूर्ण वेषभूषा, नृत्य आणि संगीत अशी वैशिष्ट्ये असणारे चित्ररथ उपस्थितांची दाद मिळवत असतात. यावर्षीही आसाम, छत्तीसगड,गुजरात, हिमाचल प्रदेश,जम्मू आणि काश्मीर, केरळ, महाराष्ट्र, मणिपुर, नागालँड, ओडिशा, पुदुचेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि पंजाब आदी राज्यातील केंद्र सरकारमधील विविध मंत्रालये सहभागी होणार आहेत.

चित्ररथासाठी गणेशोत्सव का ?

महाराष्ट्राच्या चित्ररथाची विशेष परंपरा असून दरवर्षी कलात्मक पद्धतीने आणि विविध सांस्कृतिक विषयांवर चित्ररथ साकारले जातात. यंदा ‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ याविषयावरील चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पुढे या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक मुख्य उत्सव म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले.

गणेशोत्सवातून विविध प्रकारे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असतो आणि त्यामुळे आर्थिक उलाढाल देखील होत असते. मूर्तिकार, सजावट कलाकार यांना मिळणार रोजगार हाच या चित्ररथाच्या केंद्रस्थानी असणार आहे. राज्य शासनाने गेल्यावर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केला आहे. या उत्सवामुळे आत्मनिर्भरतेला मिळणारे प्रोत्सहन या चित्ररथाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे.

चित्ररथाची वैशिष्ट्ये काय ?

महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी प्रमाणे यंदाही आकषर्क आणि कलात्मक पद्धतीने सजविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी रेखीव गणेश मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि जल्लोषात मूर्ती विसर्जन करण्यासाठी निघालेला गणेश भक्त दाखविण्यात आला आहे. तर गणपतीच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या ढोल ताशा पथकाचा समावेशही यात करण्यात आला आहे. यात एक पारंपरिक वेशभूषेतील महिला वादन करतानासह शिल्प साकारण्यात आले आहे.

तसेच रथात महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळांतील महत्वाचे श्रद्धास्थान असणारे ‘अष्टविनायक’ हे एका हेमाडपंथी बांधणीच्या मंदिरावर कोरण्यात आले आहेत. तसेच या रथावर इतरही गोष्टी अत्यंत कलात्मक पद्धतीने दाखविण्यात आल्या असून रथाच्या दोन्ही बाजूने पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांचे आणि पुरुषांचे लेझीम पथक असेल. यामुळे प्रजासत्ताक दिनी ढोल ताशाच्या गजरासह ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष ही होणार असून यानिमित्ताने मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांसह देशवासियांना होणार आहे.