Ganpatipule Temple Dress Code: महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील श्रीदेव गणपती मंदिरात आता १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी ड्रेस कोड सक्तीचा केला जाणार आहे. मंदिराचे पावित्र्य आणि परंपरा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर देवस्थान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

‘संस्थान श्रीदेव गणपतीपुळे’ या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश कोल्हटकर यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, मंदिरामध्ये गेल्या वर्षीच या वस्त्रसंहितेची प्राथमिक स्वरूपात अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर भाविकांमध्ये याबाबत गैरसमज किंवा तक्रारी राहू नयेत म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबवण्यात येत होती. आता पुढील वर्षाच्या १ जानेवारीपासून या नियमांची मंदिरात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

तोकड्या कपड्यांवर बंदी

मंदिरात येताना गुडघ्यापेक्षा वर असणारे तोकडे कपडे, शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालून येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. हा नियम पुरुष आणि महिला या दोघांनाही समान रीतीने लागू असेल. तसेच १० वर्षांखालील मुलांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. लहान मुलांना ड्रेस कोड लागू नसेल.

“भाविकांनी गुडघ्याखाली येणारे स्कर्ट अथवा शॉर्ट्स परिधान केले असल्यास त्यांना दर्शनापासून रोखले जाणार नाही. हा नियम केवळ गुडघ्यापेक्षा अधिक तोकड्या कपड्यांवरच लागू असेल,” असेही कोल्हटकर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना स्पष्ट केले.

देवस्थानची भूमिका काय?

या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करताना नीलेश कोल्हटकर म्हणाले, “लहान मुलांनी तोकडे कपडे घातल्यास ते अयोग्य वाटत नाही; मात्र सज्ञान व्यक्तींनी मंदिरात असे कपडे घालून येणे शोभनीय दिसत नाही. मंदिराचे पावित्र्य आणि आपली प्राचीन संस्कृती-परंपरा राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात प्रवेश करताना योग्य वेशभूषा करावी आणि ड्रेस कोडचे पालन करावे, अशी आमची नम्र विनंती आहे.”

सुरुवातीला जेव्हा हा नियम लागू केला होता, तेव्हा काही भाविकांनी माहिती नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊनच आधी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.

गणपतीपुळे येथे दरवर्षी साधारण २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात दररोज सरासरी १ हजार भाविक हजेरी लावतात, तर संकष्टी आणि विनायकी चतुर्थीच्या दिवशी हा आकडा पाच पटीने वाढतो. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे अन्नछत्र आणि निवासव्यवस्थेची पुरेशी सोय उपलब्ध असल्याचेही ट्रस्टने नमूद केले.