पुणे : राज्यातील आगामी काळात उभारली जाणारी सर्व जागतिक क्षमता केंद्रे केवळ मुंबई किंवा पुण्यात असण्याची गरज नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांत कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. राज्याच्या धोरणामध्ये छोट्या शहरांना या परिसंस्थेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अन्य उदयोन्मुख शहरी केंद्रांमध्ये विशेषीकृत जागतिक क्षमता केंद्रांची कार्ये विकसित करता येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जीसीसीप्रोज नेतृत्व शिखर परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर मंजूषा नागपुरे, वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध जागतिक क्षमता केंद्रांचे प्रमुख, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जीसीसी) देशातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा सरकारचा निर्धार आहे. यासाठी राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

देशातील जागतिक क्षमता केंद्रांच्या वाटचालीची सुरुवात कुशल मनुष्यबळ, कौशल्य आणि खर्चाच्या दृष्टीने कार्यक्षमतेच्या आधारे झाली. मात्र, आता या क्षेत्राचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आगामी काळात जागतिक क्षमता केंद्रे केवळ कार्यालयीन सहायक कामकाजापुरती मर्यादित राहणार नाहीत. ती अभियांत्रिकी, कृत्रिम प्रज्ञा (एआय), उत्पादन विकास, सायबर सुरक्षा, वित्तीय सेवा, विदा विश्लेषण, तसेच संशोधन व विकासाची केंद्रे बनतील. या केंद्रांमधून जागतिक व्यवसायांचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात परिसंस्था विकसित

महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक परिसंस्था राज्यात आधीपासूनच उपलब्ध आहे. मुंबईकडे देशातील सखोल वित्तीय व व्यावसायिक परिसंस्था आहे. पुण्याकडे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्र, तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाचा मजबूत आधार आहे. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्येही जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्रे विकसित करण्याची क्षमता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुणे देशाचे नेतृत्व करेल

पुण्याने २०२५ मध्ये जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रातील आपली योग्यता सिद्ध केली आहे. पुणे २०२५ मध्ये जागतिक क्षमता केंद्रांची देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कार्यालयीन बाजारपेठ बनले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचे नेतृत्व करेल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.