मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी खासदार सूनेत्रा पवार यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पवार यांची निवड केली जाईल. अजितदादांच्या निधनानंतर चारच दिवसांत सूनेत्रा पवार या मोठी जबाबदारी स्वीकारणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सूनेत्रा पवार यांची नेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते व अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व सूनेत्रा पवार यांनी करावे, असा पक्षात मतप्रवाह होता. आमदारांनीही तशीच मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. फडणवीस यांनी मान्यता दिल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सूनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी होकार दिल्याने उद्याची बैठक व शपथविधी पार पडणार आहे.
विधान भवनात होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सूनेत्रा पवार यांची निवड झाल्यावर सायंकाळी ५ वाजता राजभवनात अत्यंत साध्या पद्धतीने सूनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल. राष्ट्रवादीच्या कोट्यातील आणखी एक मंत्रिपद रिक्त असले तरी उद्या फक्त सूनेत्रा पवार यांचाच शपथविधी पार पडेल, असे सांगण्यात आले. राज्यात आतापर्यंत १० जणांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. पण उपमुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या सूनेत्रा पवार या पहिल्याच उपमुख्यमंत्री असतील.
जयंत पाटलांकडे वित्तखाते ?
सूनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश होणार असला तरी त्यांच्याकडे वित्त खाते सोपविले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्याकडे अन्य खात्याचा पदभार सोपविला जाऊ शकतो. राष्ट्रवादीतील विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरू आहे. ते प्रत्यक्षात आल्यास काही काळाने जयंत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्याकडे वित्त खाते सोपविले जाऊ शकते. अजित पवार यांच्याकडे असलेली वित्त व नियोजन, उत्पादन शुल्क तसेच क्रीडा ही खाती राष्ट्रवादीकडे कायम राहावीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.
फडणवीस यांची ग्वाही :
आम्ही सरकार आणि भाजप म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठामपणे पाठीशी उभे असून उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय त्या पक्षाने घ्यायचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. . अजित पवार यांच्या निधनानंतर आता नेता निवडीबाबतचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी दोन वेळा चर्चा झाली असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. राष्ट्रवादीकडून जे नाव कळविले जाईल त्याला आमचा पाठिंबा असेल. असेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची बरीच तयारी केली होती. आता अर्थसंकल्पाबाबतच्या पुढील बैठका मी घेणार असल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

