Snehalaya NGO / अहिल्यानगर : मुली आणि महिलांना सुरक्षा, सन्मान देणं ही पोलिसांबरोबरच कुटुंबीय आणि समाजाचीही जबाबदारी आहे. मुलींना आपला आवाज उठवता आला पाहिजे; अन्यथा प्रारंभी किरकोळ वाटणारी छेडछाड आणि पाठलागाची घटना गंभीर बनू शकते, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ॲड. विजया रहाटकर यांनी आज, शनिवारी नगरमध्ये बोलताना सांगितले.
स्नेहालय संस्था आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने ‘महिलांची छेडछाड आणि पाठलाग’ या विषयावरील दोन दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. अतिरिक्त पोलिस महासंचालक आश्वती दोरजे (महिला सुरक्षा), तेलंगणामधील प्रज्वला संस्थेच्या डॉ. सुनिता कृष्णन, तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, न्यायाधीश योगेश पैठणकर, ॲड. शिरीन मर्चंट, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.
रहाटकर म्हणाल्या, मुलींची छेड काढणं, तिच्या इच्छेविरुद्ध पाठलाग करणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मुलींनी त्याविषयी लगेच पालकांना सांगितलं पाहिजे. ‘असं होत असतं, दुर्लक्ष कर, तुझा रस्ता बदल’, अशी समजूत बरेच पालक घालतात. अनेक घरांत पालक आणि मुलांमध्ये संवादच नसतो. त्यामुळे पालकांशी बोलायला मुली घाबरतात.
मित्रांना सांगावं, तर ते गैरफायदा घेण्याची शक्यता असते. अशावेळी मुलींची घुसमट होते. त्या घरातून बाहेर पडायला घाबरू लागतात, एकलकोंडी बनतात, मानसिक आजाराची शिकार होतात. ज्या घरात मुलीला तिचं म्हणणं मोकळेपणानं पालकांना सांगता येतं, ती कधीच पिडीत, शोषित होणार नाहीत.
‘स्नेहालय’चे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी महिलांसाठी संस्था करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यापुढे ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘अँटी स्टाॅकिंग डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. विजया रहाटकर यांनीही त्यास समर्थन दिलं. ‘स्नेहाधार’च्या अहिल्यानगर आणि पुण्यातील कामांची विद्या घोरपडे आणि मानसी चंदगडकर यांनी माहिती दिली.
स्नेहालयचे संचालक हनिफ शेख यांनी संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. नीक कॉक्स, तसेच स्वाती भटकळ यांनी ‘स्टॉकिंग’ या विषयावर तयार केलेल्या चित्रफिती सादर केल्या. यावेळी चेहऱ्याच्या टाल्कमयुक्त पावडरचे उत्पादन आणि विक्री यावर भारतात बंदी घालण्यात आयोगाने पुढाकार घ्यावा, अशा मागणीचे निवेदन स्नेहालय व उपस्थित संस्थानी निवेदनाद्वारे ॲड. रहाटकर यांच्याकडे केली.
राष्ट्रीय महिला आयोगाचे महत्त्व
राष्ट्रीय महिला आयोग केवळ तक्रारी ऐकण्यासाठी नसतो, तर महिलांसाठीच्या कायद्यांत सुधारणा करण्याबरोबरच नवे कायदे करण्यासाठी केंद्र सरकारला आयोग सूचनाही करू शकतो, असे आयोगाच्या अध्यक्ष ॲड. रहाटकर यांनी सांगितले. ‘पाठलाग’ या विषयावर देशभर कार्यशाळा घेऊन यासंबंधी ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारला सांगण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
