अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत

जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील सर्वच जिल्ह्यांना बसला.

मुंबई : राज्यात जुलैपासून अतिवृष्टी, पुरामुळे शेती- पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या मदतीचे वाटप गुरुवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. केंद्र सरकारच्या मदतीच्या निकषांपेक्षा दीडपटीने ही मदत देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मदतीच्या पॅके जमधील चार हजार कोटींचे वाटप गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील सर्वच जिल्ह्यांना बसला. त्यात ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळेही शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती मदत निधी (एनडीआरएफ)च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुरामुळे शेतजमीन खरडून गेली असेल तर ३७ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत दिली जाणार आहे. ही मदत सर्वाना दोन हेक्टर मर्यादेत मिळेल. ही मदत केंद्राच्या मदतीच्या निकषांपेक्षा अधिक असून पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना लगेच मदतवाटप सुरू होईल, असेही भुसे यांनी सांगितले.

मदत अशी.. जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल. दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार असून, ती केंद्राच्या निकषापेक्षा अधिक असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra government announces rs 10000 crore help to farmers affected by heavy rains zws

ताज्या बातम्या