महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेद्वारे करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारच्या तयारीबाबत माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आम्ही पुरेशी तयारी करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेसाठी कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील १०० टक्के पदे भरण्याबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. १२०० पेक्षा अधिक डॉक्टर ५ सप्टेंबर पर्यंत रुजू होतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. सप्टेंबर अखेरीस क आणि ड वर्गाच्या जेवढ्या रिक्त जागा असतील त्यादेखील भरल्या जातील असे राजेश टोपे म्हणाले.

आरोग्य विभागाने १००० रुग्णवाहिका खरेदी करुन त्या प्राथमिक रुग्णालयांमध्ये नेमण्यात येणार आहेत. ऑक्सिजनची क्षमता १३०० मेट्रिक टनवरुन २००० मेट्रिक टन पर्यंत वाढवण्यात आली आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आम्ही जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आम्ही १२०० डॉक्टरांची भरती करत आहोत. सप्टेंबरच्या अखेरीस, आम्ही ७,००० अधिक आरोग्य कर्मचारी भरती करू असे त्यांनी म्हटले. ऑक्सिजनचे उत्पादन आणि हॉस्पिटल बेडची संख्या वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आशा कामगारांच्या वेतनात १५०० रुपयांची वाढ मंजूर केली असल्याचे टोपे यांनी सांगितले. यामुळे ७१,००० आशा कामगारांना फायदा होईल. यासाठी अंदाजे २७५ कोटी रुपये खर्च केले जातील असे टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले की, तिसऱ्या लाटेत ६० लाख लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ही तयारी सुरू केली जाते. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक परिपत्रक पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये १५ सप्टेंबरपूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा उघडण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारचे हे एक मोठे पाऊल असणार आहे.