मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट आठवडा राहिला तरीही दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विधान सभा किंवा विधान परिषदेत चर्चा होऊ दिली जात नाही. सत्तेतील मोठ्या नेत्याचा अपघातात हात असावा म्हणून चर्चा टाळली जात आहे. राज्य सरकारने अद्याप केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास करण्याची मागणी करणारे पत्रही पाठविले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

विधान सभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापतींना भेटून, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव दाखल करून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबच विधीमंडळात सविस्तर चर्चेची मागणी आम्ही करीत आहोत. पण, आजवर ना विधान सभेत ना विधान परिषदेत चर्चा झाली. सत्ताधारी जाणीपूर्वक चर्चा करण्याचे टाळत आहेत. सत्तेतील मोठ्या नेत्याचा अपघातात हात असावा, त्यामुळेच चर्चा होऊ दिली जात नसावी, असा आरोपही पवार यांनी केला.

चर्चा टाळून राज्य सरकार कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हीएसआर विमान कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे अजितदादाच्या घातपातामागे कुणीतरी सत्ताधारीच आहे, हा आमचा आरोप खरा ठरतो आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. स्मरणपत्र दिले. तरीही राज्य सरकारने अद्याप तपास करण्याची मागणी करणारे पत्र सीबीआयला पाठविले नाही.

राज्यातील सरकारला अपघाताचा तपास व्हावा, असे वाटतच नाही. जय पवार यांची या आठवड्यात पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर मी मुंबईतच या विषयावरील शेवटची पत्रकार परिषद घेणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह दिल्लीतील अनेक नेते या विषयावर आम्हाला मदत करीत आहेत. संसदेत संजय राऊत यांच्यासह आमच्या पक्षाच्या खासदारांना या विषयावर बोलू दिले जात नाही, असेही पवार म्हणाले.