ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यास मान्यता

मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारचे महत्वाचे निर्णय

Navi Mumbai International Airport D B Patil
गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा पार पडली

राज्यात एकीकडे वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार संकटात असताना पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव करण्यासही मंजुरी देण्यायत आली आहे.

गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा पार पडली. यावेळी दि बा पाटील यांचं नाव देण्यास मान्यता देण्यात आली. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विचाराधीन होता. एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते.

विश्लेषण : दि. बा. पाटील, विमानतळ नामकरण आणि शिवसेनेचे राजकारण…

जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

मंगळवारी नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याची माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दिली होती. विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याला होकार असल्याचं सांगितलं होतं. आज त्याला मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली.

एकनाथ शिंदेंचं ‘ते’ पत्र!

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी हे विमानतळ बांधलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला होता. डिसेंबर २०२०मध्ये राज्याचे नगरविकास मंत्री आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या बंडाळीच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीच सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात CIDCO ला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं, असा प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली होती.

कोण होते दि. बा. पाटील?

दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचा जन्म रायगडच्या उरण तालुक्यातल्या जसई गावात झाला. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या दि. बा. पाटील यांनी १९५१मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर ते राजकारणात सक्रीय झाले. पीझंट्स वर्कर्स पार्टीशी ते संबंधित होते. १९५७ ते १९८० या काळात ते पाच वेळी पनवेलमधून आमदार म्हणून निवडून गेले होते. १९७७ ते १९८४ या काळात ते खासदार देखील होते. १९७२ ते १९७७ आणि १९८२-८३ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना अटक देखील झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra government cabinet meeting navi mumbai international airport d b patil sgy

Next Story
मंत्रीमंडळ बैठकीत नामांतराबाबत मोठे निर्णय; ‘संभाजीनगर’, ‘धाराशीव’ नावांचा प्रस्ताव मंजूर
फोटो गॅलरी