मुंबई : राज्यात अलीकडच्या काळात सुमारे सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भ व मराठवाडा विभागात गेल्या वर्षभरात १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, या विभागात दररोज सरासरी ३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली.
वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, शेतीमालाला हमी भाव न मिळणे, निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान तसेच अपुऱ्या शासकीय मदतीमुळे शेतकऱ्यांवर मानसिक ताण वाढणे, बँकांच्या जाचक अटी व कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा किंवा आर्थिक अडणीमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
मात्र तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत विधानसभेत सुलभा खोडके, अब्दुल सत्तार, अनिल पाटील, जयंत पाटील, अमित देशमुख, अतुल भातखळकर आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात पश्चिम विदर्भ व मराठवाडा विभागात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याची कबुली देण्यात आली.
राज्यात विशेषतः पश्चिम विदर्भातील २००९ शेतकऱ्यांनी तर मराठवाड्यात ११२९ शेतकऱ्यांनी तसेच जळगाव जिल्हयात २,७८३ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद असून सन २०२५ मध्ये सर्वाधिक २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाल्याची सरकारने मान्य केले आहे. चालू आर्थिक वर्षात पश्चिम विदर्भ व मराठवाडा विभागात १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून या विभागात दररोज सरासरी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत कर्जमाफी, आपत्ती निवारण आराखडा राबविणे, हमीभाव, पीक विमा, मानसिक आरोग्य सहाय्य यांसारखी प्रभावी योजना करण्याबाबत सरकारकडून कारवाई केली जात असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत केली जात असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
कर्जफेडीसाठी शेतकऱ्याने मूत्रपिंड विकले
चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाच्या परतफेडीसाठी किडनी काढण्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी आरोपींना मोक्का लावण्यासंदर्भात विचार केला जाईल. तसेच आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
अवैध सावकारीप्रकरणी या कायद्यात आणखी सुधारणा करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागभीड तालुक्यातील मिथूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यात ओढून कंबोडियात नेऊन मूत्रपिंड काढल्याप्रकरणी अतुल भातखळकर, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आदी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान भोयर यांनी ही माहिती दिली.
या शेतकऱ्याने सहा जणांकडून ९.१५ लाखाचे कर्ज घेतले होते. त्याची फरतफेड म्हणून ४८.५३ लाख रुपये, एक एकर जमीन, टॅक्टर याच्यासह स्वतःची किडणी विकून आठ लाख रुपये दिले. ही गंभीर बाब उघडकीस आल्यानंतर सरकारने विशेष तपास पथकाच्या माध्यमातून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. तर या प्रकरणातील डाॅक्टरला पद्मपुरस्काने सन्मानित करण्यात आले असून त्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

