मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा – २०२६ च्या (टीईटी)  पेपरफुटी प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथका मार्फत करण्यात येत आहे. हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पुढील वर्षापासून टीइटीसह सरकारच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील, त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सभागृहात हा प्रश्न लावून धरल्यामुळे मंत्री भुसे यांनी सभागृहात या विषयावर सविस्तर निवेदन केले.

या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याबाबतही तपासादरम्यान निर्णय घेतला जाणार आहे. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विक्रीसाठी काही लोक येणार असल्याची माहिती २७ जून रोजी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून ठाणे शहर पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खात्री केल्यानंतर जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका ही परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात आरोपींकडून प्रश्नपत्रिका बेकायदेशीररीत्या मिळवून मोठ्या रकमेत विक्री करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांनी प्रतिबंध) अधिनियम, २०२४ तसेच महाराष्ट्र विद्यापीठे व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम, १९८२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.

विशेष तपास पथकाकडून तपास होणार

पेपर फुटीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडे संपूर्ण तपास वर्ग करण्यात आला असून, तपासासाठी बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या तिन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे.

फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारणार नाही

फेरपरीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल.

फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

पुढील वर्षापासून टीईटीसह सर्व परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जातील.

यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असून, ती आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करणार आहे,असेही भुसे म्हणाले.