राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा नव्या वळणावर आला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला आमंत्रण दिलं असून, आजचा दिवस शिवसेनेसाठी कसोटीचा ठरणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडं नाही. त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मदार असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला ‘हात’ देते का? यावरच शिवसेनेचं मुख्यमंत्रीपदाच स्वप्न अवलंबून आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवस लोटले आहेत. बहुमत मिळालेल्या भाजपा-शिवसेना यांची महायुती मुख्यमंत्रीपदारून दुभंगल्यानं भाजपानं सरकार स्थापन करण्यास नकार दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचं सांगितलं.
सत्ता स्थापन करण्यास भाजपानं नकार दिल्यानं राज्यपालांनी शिवसेनेला रविवारी (१० नोव्हेंबर) आमंत्रण दिलं. सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडं आजचा दिवस असून, शिवसेना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी काय तडजोडी करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घ्यावीच लागणार आहे. दुसरीकडं शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.
शेजारील कर्नाटकप्रमाणेच राज्यातही बिगर भाजप सरकारसाठी पाठिंबा द्यावा, अशी काँग्रेसच्या बहुसंख्य नवनिर्वाचित आमदारांची भूमिका असली तरी, शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देण्यास पक्षनेतृत्व मात्र राजी दिसत नाही. यावरून काँग्रेसमध्ये उघडउघड दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली शिवसेना भागीदार असलेल्या सरकारचे समर्थन करता येईल, पण शिवसेनेचे कसे करणार, हा प्रश्न काँग्रेससमोर आहे.
तर राष्ट्रवादीही शिवसेनेस पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं दिसून येत आहे. मात्र, पाठिंबा हवा असल्यास शिवसेनेला ‘एनडीए’तून बाहेर पडावं लागेल अशी अट राष्ट्रवादीनं घातली आहे. दोन्ही काँग्रेससोबत तडजोडी करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुढाकार घेतला असून, आज दिवसभरात वेगवान घटना घडणार आहे. मुंबईसह दिल्लीतही राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल खलबतं होणार आहेत. त्यानंतर सायंकाळपर्यंत शिवसेना सरकार स्थापन करण्याचा दावा करते की आणखी वाढीव वेळ मागते हे चित्र स्पष्ट होणार आहे.
