मुंबई: हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता हॉटेलना आपल्या पदार्थांच्या यादीत पनीर आहे की ‘चीच ॲनलॉग’ याची नोंद करावी लागणार आहे. आपले मेन्यूकार्ड आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवरही याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने याविषयी परिपत्रक जारी केले होते. पनीरच्या नावाखाली होणारी भेसळ रोखणाऱ्या महाराष्ट्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात होणार आहे. १ मेपासून याची देशभरात अंमलबाजवणी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.
राज्यातील अनेक रेस्टॉंरंट्स, हॉटेल्स व फास्ट फूड सेंटरमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त दरात उपलब्ध होणारे चीज ॲनालॉग वापरून फसवणूक केली जाते. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी यासंदर्भात अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी परिपत्रक काढून २७ एप्रिलपासून पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे बंधनकारक केले होते. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून २७ एप्रिलपासून विशेष मोहीमही राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाची केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा प्राधिकरणाने (FSSAI) याची दखल घेत, २१ एप्रिल २०२६ रोजी तसे परिपत्रक काढून हा नियम संपूर्ण देशभर हा नियम लागू करण्यास मान्यता दिली आहे.
हॉटेल्स, उपाहारगृहे आणि जलद खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला असून बिलावर, इलेक्ट्रॉनिक दर्शक फलकावर आणि मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक केले आहे. तसेच नागरिकांनी संबंधित उत्पादन घेताना लेबल काळजीपूर्वक वाचावे. त्यावर चीज ॲनालॉग असा उल्लेख आहे का, हे तपासावे, असे आवाहन मंत्री झिरवाळ यांनी काढलेल्या परिपत्रकात केले आहे.
उल्लेख न केल्यास कारवाई, परवाना रद्द
अन्न व औषध प्रशासन विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटला पारदर्शकता पाळावी लागेल. तसेच एखाद्या पदार्थात दुधापासून बनवलेल्या नैसर्गिक पनीरऐवजी वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेले ‘ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक असेल. १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल. जे हॉटेल चालक माहिती लपवतील, त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाईल. चीज ॲनालॉगच्या पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. हॉटेल संघटनांशी चर्चा करून सर्व विभागीय अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नवीन नियमाची माहिती रेस्टॉरंट आणि केटरर्सना मोबाईल संदेशाद्वारे देण्यात येईल.
पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक
अन्न सुरक्षा मानके विनियम २०११ नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. तर पनीरसारखा दिसणारा चीज ॲनलॉग हा दुधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला, तरी पनीर नसून ‘चीज ॲनालॉग’ या प्रवर्गात मोडतो. ग्राहकांची दिशाभूल झाल्यास प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
