मुंबई : राज्य शासनाच्या वतीने मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य या योजनेंतर्गत गेल्या वर्षी ऑक्टोबर, डिसेंबर मध्ये परीक्षण केलेल्या अ, ब, क श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले.
राज्यातील इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी चित्रपटगृहांचे जतन व विकास करण्यात येणार आहे. मुंबईत एकत्रित सुविधांसह स्वतंत्र नाटयगृह, चित्रपटगृह उभारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटास ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. अपर्णा होशींग, शेट्टी, स्नेहल तरडे या दिग्दर्शक महिलांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात आले. चित्रपटांच्या ‘अ’ दर्जासाठी ४० लाख, ‘ब’ दर्जासाठी ३० लाख आणि ‘क’ दर्जासाठी दहा लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले.
२०१८ ते २०२२ या कोविड काळात सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. या कालावधीत निर्मात्यांची आर्थिक अवस्था गंभीर होती. या कालावधीतील सेन्सॉर प्राप्त चित्रपटांना ४ कोटी ९० लाख रुपयांचे वितरण करण्यात येत आहे. चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी २८ सदस्याची समिती गठीत करण्यात आली आहे. हे सदस्य चांगल्या प्रकारे काम करत आहेत. चित्रपटांचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०२३ ते २०२६ या तीन वर्षात ४९६ चित्रपटाची परीक्षण केले आहे.
