वर्धा : सरकारी रुग्णालय तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रात अत्यंत गरजू रुग्ण उपचारासाठी जात असतात. उपचार व त्या सोबतच आवश्यक ती औषधी याच ठिकाणी मिळावी अशी अपेक्षा असते. परंतू ही औषधी मिळत नाही व बाहेरून विकत घेण्यास सांगितल्या जाते, अशी सार्वत्रिक ओरड ऐकायला मिळण्याची बाब नवी नाही. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य खात्याने काही निर्देश दिले आहेत.

आवश्यक व ऐच्छीक

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील सर्व स्तरांवरील आरोग्य केंद्रे आणि सरकारी रुग्णालयांसाठी आवश्यक औषधांची ‘आवश्यक औषध यादी’ (Essential Drug List – EDL) आणि ‘ऐच्छिक औषध यादी’ (Desirable List – DL) अंतिम करून प्रसिद्ध केली आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी परिपत्रक काढून सर्व संस्थाप्रमुखांना यापुढे रुग्णालयांमध्ये ‘EDL’ नुसार औषधे प्राधान्याने उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक सर्व उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवण्यात आले आहे.

केंद्र सरकारचे मानक

केंद्र सरकारच्या ‘आयपीएचएस’ (IPHS/GOI) मानकांचा संदर्भ घेऊन आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या विविध बैठकींमधील सल्ल्यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. तसेच काही सूचना पण केल्या आहेत.

१.औषधांची उपलब्धता सर्व सरकारी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये प्राथमिकतेने EDL यादीतील औषधांचा साठा उपलब्ध ठेवणे बंधनकारक राहील.
२.पारदर्शकता व शिस्त: संस्थाप्रमुख व जिल्हाप्रमुखांनी औषध पुरवठा आणि उपलब्धतेबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३.यादीतील बदल: शासनाच्या अधिकृत आदेशाशिवाय या औषध याद्यांमध्ये कोणताही परस्पर बदल करता येणार नाही.
४ विस्तृत वर्गीकरण: यादीमध्ये ॲनेस्थेटिक्स, अँटी-बायोटिक्स, अँटी-कॅन्सर, अँटी-डायबेटिक, हृदयविकारावरील औषधे, लस (Vaccines) आणि जीवनसत्त्वांचा समावेश आहे.

औषधी विनामूल्य देणे

रुग्णालयांच्या क्षमतेनुसार (उदा. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) औषधांची विभागणी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना वेळेवर आणि योग्य ती अत्यावश्यक औषधे विनामूल्य मिळण्यास मदत होणार आहे. या सोबत नमूद औषधंची यादी जाहीर करण्यात आली आहे. याच यादीनुसार औषध साठा ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासकीय रुग्नोपचार आता सहज ठरतील अशी अपेक्षा व्यक्त केल्या जाते