scorecardresearch

पोलिसांच्या रजांमध्ये वाढ; कामाचा ताण विचारात घेऊन निर्णय

गृहविभागाने सादर केलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने पोलिसांना २० किरकोळ रजा मिळणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : राज्यभरातील पोलिसांना वर्षभरात १२ किरकोळ रजा मिळत होत्या. पोलिसांना मिळणाऱ्या किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून पोलिसांना आता २० किरकोळ रजा मिळणार आहेत.

कायदा सुव्यवस्था, गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच मोर्चा, आंदोलने, राजकीय नेत्यांचा बंदोबस्त सांभाळणाऱ्या पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. पोलिसांवर पडणाऱ्या कामाचा ताण विचारात घेऊन पोलिसांच्या हक्काच्या रजा वाढविल्या पाहिजेत, असा प्रस्ताव गृहविभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. पोलिसांना यापूर्वी १२ किरकोळ रजा मिळत होत्या. किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून नवीन नियमानुसार पोलिसांना वर्षभरात २० किरकोळ रजा मिळणार आहेत.

ज्या पोलीस कर्मचाऱ्याची दुसऱ्या दिवशी रजा आहे किंवा साप्ताहिक सुट्टी आहे. अशा कर्मचाऱ्यांना रजेच्या आदल्या दिवशी रात्रपाळीच्या कर्तव्यावर बोलावू नये, अशा सूचना गृहविभागाकडून देण्यात आल्या आहेत. किरकोळ रजांमध्ये वाढ केल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

वर्षभरात ६५ रजा

गृहविभागाने सादर केलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने पोलिसांना २० किरकोळ रजा मिळणार आहे. वर्षभरात पोलीस कर्मचारी ४५ अर्जित रजा घेऊ शकतात. अर्जित रजा टप्प्याटप्प्याने किंवा एकदमही घेता येतात तसेच वर्षभरात २२ दिवस वैद्यकीय रजा मिळतात. मात्र अनेक पोलीस कर्मचारी वैद्यकीय रजांचा फारसा लाभ घेत नाहीत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रसूतीसाठी एक वर्ष तसेच बालसंगोपन रजा मिळते.

कार्यकाल अधिक..

अन्य शासकीय विभागांच्या तुलनेत पोलिसांना मिळणाऱ्या रजांचे प्रमाण कमी आहे. शासकीय कार्यालयांना शनिवारी आणि रविवारी तसेच सणासुदीला सुट्टी असते. मात्र सणासुदीच्या काळात पोलिसांना हक्काची सुट्टी देखील मिळत नाही. महत्त्वाचे सण तसेच उत्सवाच्या काळात पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द केल्या जातात. पोलिसांचे कामाचे स्वरूप ‘ऑन डय़ुटी २४ तास’ असे असते. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांची कामाची वेळ जास्त असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra government increased police leave to reduce work stress zws

ताज्या बातम्या