मुंबई : सरकारी काम, बारा महिने थांब, ही प्रतिमा बदलण्याकरिता आता राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागात ताज्या दमाचे तंत्रज्ञ नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या तंत्रज्ञांना माहिती तंज्ञत्रान क्षेत्राप्रमाणे गलेलठ्ठ वेतन देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे.

तंत्रज्ञानाची कास धरत ‘आपले सरकार’, ‘डीबीटी’सारख्या योजना राज्य सरकारकडून राबविल्या जातात. मात्र, बहुतेककरून आयटी कंपन्यांकडून आऊटसोर्स केल्या जाणार्‍या या सेवांची संकेतस्थळे मंदावणे किंवा अन्य कारणांमुळे सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडते. दहावी-बारावीचा निकाल, ऑनलाईन प्रवेश, सातबाराचा उतारा मिळविणे किंवा मालमत्तेची नोंदणी करतेवेळेस अनेकांना हा अनुभव येतो. मुळात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून सेवा घेताना योग्य पडताळणीअभावी राहिलेल्या त्रुटी टाळण्याकरिता किंवा दिलेल्या सेवांवर देखरेख करण्याकरिता कुशल तंत्रविषयक मनुष्यबळ सध्याच्या परिस्थितीत सरकारकडे नाही.

त्यामुळे कोट्यवधी रूपये मोजून घेतल्या जाणार्‍य़ा ई-प्रशासन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारख्या सेवांमध्ये अनेक त्रुटी राहून जातात. यावर उपाय म्हणून ताज्या दमाचे तंत्र विशेषज्ञ (टेक्नोक्रॅट) राज्य सरकारच्या नव्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभागामार्फत नेमले जाणार आहेत. यामुळे निविदा मागविण्यापासून ते आयटी कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या तांत्रिक सेवांवर देखरेख ठेवून त्या अद्ययावत करण्यापर्यंतच्या कामात सुधारणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यासाठी तब्बल १३३ कोटी ३५ लाख रुपयांच्या वार्षिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. साहजिकच अन्य विभागांच्या तुलनेत या तंत्रज्ञांना उच्च श्रेणीचे वेतन मिळणार आहे.

तंत्रज्ञानात सातत्याने नवनवीन संकल्पना आणि बदल होत आहेत. त्यांचा अभ्यास आणि विश्लेषण करून प्रशासनात त्यानुसार बदल करणे आवश्यक होते. त्यासाठी ही तांत्रिक पदे निर्माण करण्यात आली आहेत. तंत्रज्ञानाच्या अशा प्रभावी वापरामुळे पारदर्शकता आणि गतिमानता येईल. -ॲड. आशीष शेलार, माहिती तंत्रज्ञानमंत्री

नवीन पदे

  • माहिती तंत्रज्ञान व कृत्रीम बुद्धीमत्ता आयुक्तालयासाठी ७७ पदे.
  • मंत्रालय व इतर प्रशासकीय विभागासाठी ४२७ पदे.
  • प्रकल्प देखरेख-नियंत्रणासाठी तांत्रिक संवर्गातील ३८९ पदांची बाह्य यंत्रणेद्वारे भरती.
  • २०० अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी अंतरवासिता (इंटर्नशिप) कार्यक्रम.

पद – वेतनश्रेणी (रुपयांत)

* संचालक – १.३१ ते २.१६ लाख

* सहसंचालक – १.१८ ते २.१४ लाख

* सहायक संचालक – ७८ हजार ते २.०९

* विश्लेषक कम प्रोग्रामर- ६७ हजार ते २.०८ लाख

* सॉफ्टवेअर प्रोग्रामर – ५६ हजार ते १.७७ लाख