नांदेड : ‘लाडकी बहीण योजने’मध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देते. ज्या बहिणींना उद्याोग सुरू करावयाचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्याोगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता ‘लाडकी बहीण योजने’तून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

मुखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवार बोलत होते. राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेवर ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला, तरी विरोधक अफवा पसरवतात. पण बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवू नये. ही योजना बंद होणार नाही, असे पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मी पुन्हा येणार’

आपल्या आग्रहावरून अजित पवार दोन वेळा नांदेडच्या दौऱ्यावर आले. येत्या काळात आपला पक्ष ‘नंबर वन’ असेल, असे आश्वासन देताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांना आणखी दोन वेळा नांदेडमध्ये येण्याचा आग्रह केला. हा धागा पकडून आपल्या भाषणात अजित पवारांनी ‘मी पुन्हा येणार’ अशा शब्दांत चिखलीकरांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.