महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवली जाणे हे अनिवार्य असेल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. दादा भुसे यांनी असंही सांगितलं की या नियमाचं कुणी उल्लंघन केलं तर त्या शाळेवर कारवाई करण्यात येईल असंही दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा
महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी दादा भुसे यांनी मराठी भाषेबाबत जो प्रश्न विचारण्यात आला त्याला उत्तर देत असताना ही घोषणा केली. मराठी भाषा शिकवणं हे प्रत्येक शाळेसाठी अनिवार्य असेल. जर कुणीही हा नियम मोडला तर त्यांच्यावर सरकार कारवाई करणार हे नक्की. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रात अनेक शाळा अशा आहेत ज्या मराठी विषय शिकवणं हा ऐच्छिक विषय आहे असं मानतात आणि मराठी भाषा शिकवत नाहीत. त्यावर उत्तर देताना दादा भुसे यांनी घोषणा करत राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य असेल अशी घोषणा केली.
मराठी भाषा न शिकवणाऱ्या भाषांवर कारवाई केली जाणार-भुसे
महाराष्ट्राचं सरकार हे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी भाषेला प्रोत्साहन मिळावं यासाठी तसंच प्रसारासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. मराठी भाषा ही सर्व शाळांमध्ये शिकवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मराठी भाषा सर्व शाळांमध्ये योग्य पद्धतीने पहिली ते दहावी या वर्गांना शिकवली जाते आहे की नाही? हे तपासण्यासाठी एक विशेष तपास पथक मोहीम राबवली जाणार आहे. मराठी भाषा सरकारने अनिवार्य केल्यानंतरही जर शाळा हा नियम धुडकावणार असतील तर त्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
इतिहास या विषयाबाबतही दादा भुसे यांचं भाष्य
शालेय अभ्यासक्रमातील इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा विस्तृत स्वरुपात देण्यात आला आहे. यापूर्वीच्या शिक्षण मंडळांच्या पाठ्य पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एक किंवा दोन कॉलम इतकाच मर्यादित होता. मात्र केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची २२ पानं ही अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतरचे मराठा शासक यांची माहिती मुलांना विस्तृत स्वरुपात मिळण्यासाठी आपण हा निर्णय राबवला आहे अशीही माहिती दादा भुसेंनी विधानसभेत दिली.
