सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. मराठा आरक्षणाबाबत जो सर्व्हे सुरु आहे त्याबाबत काहीही माहिती नसणाऱ्या कर्मचाऱ्याला सर्व्हेसाठी बसवण्यात आलं आहे असा तो व्हिडीओ आहे. त्याला एक माणूस प्रश्न विचारतो त्याबाबत त्या माणसाला काही नीट सांगता येत नाही. नेमका हाच व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकार मराठा बांधवांच्या भावनांशी खेळ करतं आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट काय?
हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खरच गंभीर आहे का..? कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही, सगळा फॉर्म डिजिटल असताना त्याला मोबाईल वापरता येत नाही, सर्व्हे नेमका कशासाठी चाललं आहे, याचच त्याला ज्ञान नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तो या कामासाठी पुरेसा शिक्षित नाही. एकीकडे लक्षावधी मराठा बांधव त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असताना,ते मुंबई कडे कूच करत असताना देखील हे सरकार सर्व्हेचा असा फार्स निर्माण करत असेल तर मराठा आरक्षण संदर्भात ते किती गंभीर आहेत,हे लोकांच्या आता लक्षात येत आहे.
आरक्षण देणार ते कसे देणार..? ओबीसी मधून देणार की इतर कोणत्या कोट्यातून देणार.? इतर कोट्यातून दिले तर ते कोणत्या प्रकारे देणार..? या मूळ प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही.उलट असे सर्व्हे चे नाटक करून लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी हे सरकार क्रूर पद्धतीने खेळत आहे आणि हा प्रकार आपल्या या राज्याचा हिताचा नाही,हे मी निक्षून सांगू इच्छितो. अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय?
जितेंद्र आव्हाड यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात एका कर्मचाऱ्याशी एक माणूस संवाद साधतो आहे. तो संवाद असा आहे.
नमस्कार साहेब, आपलं नाव काय ते सांगा?
“माझं नाव मनोज काशिनाथ कांबळे”
आपण कशासाठी आला आहात?
“मराठा आरक्षणाच्या सर्व्हेसाठी”
आपण कुठे काम करता?
“महानगरपालिका, केडगाव”
आपल्याला काही ट्रेनिंग दिलं गेलंय का?
कर्मचारी: “होय. ट्रेनिंग दिलं गेलं आहे, पण माझं शिक्षण जास्त नसल्याने मला यातली फारशी माहिती नाही. मला माहिती नसल्याने मी एक जोडीदार बरोबर घेतला आहे. त्याच्याकडून माहिती भरुन घेतो आहे.”
तुम्ही माहिती काय विचारत आहात?
कर्मचारी: “आम्ही ही माहिती विचारतो की, नाव काय, नंबर काय? आधार कार्ड अशी माहिती विचारतो. “
घर आहे का? व्यवसाय काय? या माहितीचं काय?
कर्मचारी: “मला तर यातलं जास्त काही कळत नाही.”
पालिकेत काय काम करता?
कर्मचारी: “मी इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून काम करतो. सर्व्हे कसा करायचा याची ट्रेनिंग दिली आहे, पण मला काही इतका अनुभव नाही. “
तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का?
कर्मचारी “नाही.”
तुम्ही सर्व्हे कसा करणार?
कर्मचारी : “मी याबाबत आमच्या साहेबांना सांगितलं की मला यातलं काही जमत नाही फार, तर ते म्हणाले आता माझ्या हातात काही नाही तुम्ही तुमचं बघा. एखादा जोडीदार घ्या आणि कसंही काम करा.”
मराठ्यांचं आरक्षण सर्व्हेवर अवलंबून आहे ते कसं मिळेल तुम्ही सांगा?
कर्मचारी :”मला यातला काही अनुभवच नाही, शिक्षणही नाही, मी पहिली पास आहे.” असा संवाद या व्हिडीओमध्ये आहे. ज्या कर्मचाऱ्याला काहीही माहीत नाही. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे.