मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांना एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३२ कार्यकारी अभियंता आणि १९८ उपविभागीय अभियंत्यांच्या घाऊक बदल्या केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर मुंबई, अंधेरी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन धात्रक यांची बदली ठाण्यात सार्वजिनक बांधकाम विभाग २ च्या कार्यकारी अभियंतापदी झाली आहे. तर धात्रक यांच्या जागी विशेष प्रकल्प विभाग आरे गोरेगावच्या कार्यकारी अभियंता गुंजन दिघावकर यांची वर्णी लागली आहे. मुंबईतील एकात्मिक घटक विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांची बदली कार्यकारी अभियंता म्हणून विशेष प्रकल्प विभाग आरे गोरेगाव येथे झाली आहे. ठाणे क्रमांक २चे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांची बदली महाड येथे करण्यात आली आहे.
याबरोबरच कार्यकारी अभियंत्यासह उप विभागीय अभियंत्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. त्यात विभागातंर्गत कार्यरत असलेल्या १७, अमरावती प्रादेशिक विभागातील १८, छत्रपती संभाजीनगर विभागातील १५, कोकण -१ विभागातील २७, कोकण-२ विभागातील २२, नाशिक विभागातील २५, पुणे विभागातील ३५, संकल्पचित्र मंडळातील ११, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयातील १३ तर राष्ट्रीय महामार्ग विभागातील १३ उप विभागीय अभियंत्यांचा समावेश आहे.
भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. येथील रुग्णालय बांधकाम आणि दुरुस्ती उपविभागात बदली मिळावी यासाठी चुरस आहे. उपविभागीय अभियंता रणजित शिंगाडे यांच्या बदलीने ही जाागा रिक्त झाल्यानंतरही येथे अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. याबरोबरच उत्तर उपविभाग, दादर आणि मध्य मुंबई उपविभाग या जागा तूर्त रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
