धाराशिव : दुष्काळी मराठवाड्याची ओळख पुसण्यासाठी मागील दोन तपापूर्वी सुरू झालेल्या कृष्णा मराठवाडा योजनेला मूर्त रूप आले आहे. राज्य सरकारने गतवर्षी ११ हजार ७२६ कोटी रूपये निधी खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर खर्‍या अर्थाने कृष्णा मराठवाडा योजना क्र. १ आणि २ च्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर आली आहेत. जवळपास ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. घाटणे बॅरेजपासून पुढे तुळजापूरच्या रामदरा तलावापर्यंत ६३ किलोमीटरचे काम पुढील पाच महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती धाराशिव पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे व भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> माझी काय राखली म्हणत अजितदादांकडून आर आर आबा गटाचा सत्कार स्वीकारण्यास नकार

भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्र. २ अंतर्गत सुरू असलेल्या घाटणे, पडसाळी ते रामदरा तलावापर्यंतच्या विविध कामांचा माध्यम प्रतिनिधींसमवेत पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौर्‍यात घाटणे बॅरेजच्या कामाची पाहणी करण्यात आली. या बॅरेजपासून तुळजापूरच्या रामदरा तलावापर्यंतचे ६३ किलोमीटर अंतराचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ यंत्रणेने ठेवले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून या ठिकाणी ८४ एचपीचे चार पंप बसविण्यात येणार आहेत. सीना नदीपात्रात वेगवेगळ्या पाणीस्त्रोतातून जमा होणार्‍या २.२४ टीएमसी पाणी उचलून ते सीना कोळेगाव धरण अधोबाजून गुरूत्वीय बंद नलिकेद्वारे सीना नदीत सोडून पुढे हेच पाणी कॅनॉल आणि आवश्यक त्या ठिकाणी बंद नलिकेद्वारे पाणी उचलून तुळजापूरच्या रामदरा तलावात साठवले जाणार आहे. योजना क्र. २ अंतर्गत करण्यात येणार्‍या बॅरेज, बंद नलिका आणि कॅनॉलसाठी ६०९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. घाटणे बॅरेजपासून ६३ किलोमीटर असलेल्या रामदरा तलावापर्यंतचे हे काम मे महिन्यापर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट यंत्रणेसमोर आहे. त्यानंतर पावसाळ्यातील ७५ दिवस हे पाणी उचलून रामदरा तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तुळजापूर, लोहारा, उमरगा या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कामांना प्रारंभ होणार असल्याचे अधीक्षक अभियंता शिंगाडे यांनी सांगितले.

वर्षभरात ५६० कोटी निधीची तरतूद

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्र. १ व २ साठी सन २०२३-२४ मधये ३३४.७५ कोटी तर कृष्णा मराठवाडा लिंक-५ करिता २२५ कोटी, असे एकूण ५५९.७५ कोटी रूपयांच्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद धाराशिव जिल्ह्याकरिता आहे. मागील शिल्लक ३८.२१ कोटी व केंद्रीय अर्थसहाय्यातील ७५ कोटी, असे मिळून ६७२.९६ कोटींचा निधी चालू वर्षात उपलब्ध झाला आहे. एकंदरीत धाराशिव जिल्ह्याला दुष्काळी संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुतीचे सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

समुद्रात जाणारे पाणीही मिळणार

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात दरवर्षी होणार्‍या अतिवृष्टीमुळे तिथे महापूर येतो. मोठ्या प्रमाणात पाणी समुद्राला जावून मिळते. तेच पाणी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळू शकते. त्यासाठी महायुती सरकार जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महत्वपूर्ण योजना राबवित आहे. पुढील आठवड्यात जागतिक बँकेची टीम प्रकल्पाच्या पाहणीसाठी जिल्हा दौर्‍यावर येणार आहे. समुद्रात वाहून जाणारे सांगली, कोल्हापूर परिसरातील पाणी लिफ्टींग करून ते मराठवाड्यात आणल्यास मराठवाड्याच्या सिंचनक्षेत्राचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government sanctioned disbursement of rs 11 thousand 726 crore for krishna marathwada irrigation project mla ranajagjitsinha patil zws
First published on: 06-02-2024 at 18:00 IST