पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटी

घरांसाठी ५० हजार ते दीड लाख, दुकानदारांना ५० हजारांची मदत

घरांसाठी ५० हजार ते दीड लाख, दुकानदारांना ५० हजारांची मदत

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केली. त्यापैकी तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी, पुनर्बाधणीसाठी तीन हजार कोटी, तर बाधित क्षेत्रात दीर्घकालीन उपायांसाठी सात हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार ते दीड लाख, तर दुकानदारांना ५० हजारांची नुकसानभरपाई मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या मदतीस मंजुरी देण्यात आली. घरांच्या नुकसानीपोटी ५० हजार ते दीड लाख, दुकानदारांना ५० हजार तर दुभत्या जनावरांसाठी ४० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच नदीकाठच्या तसेच दगडप्रवण क्षेत्रातील लोकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचे धोरण तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रचलित मदतीपेक्षा अधिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरडी कोसळल्याने, तसेच पुरामुळे लोकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, कपडे तसेच घरगुती भांडी/वस्तू यांची खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये, कपडय़ांसाठी ५ हजार असे १० हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार आहेत. त्याचे वाटपही सुरू झाले आहे. पुराचे पाणी दुकानात घुसल्याने झालेल्या नुकसानीपोटी स्थानिक रहिवाशी असलेल्या तसेच स्थानिक मतदारयादीत नाव असलेल्या व शिधापत्रिकाधारक (पान ९ वर) (पान १ वरून) असलेल्या अधिकृत दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीतजास्त ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक मतदारयादीत नाव आणि शिधापत्रिकाधारक असलेल्या अधिकृत टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीतजास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. स्थानिक हस्तकला/ कारागिरांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीतजास्त ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे.

 

पशुधन नुकसान

दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ४० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी  ३० हजार, लहान जनावरांसाठी २० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. मेंढी, बकरीसाठी चार हजार रुपयांची मदत दिली जाईल. ही मदत कमाल तीन दुधाळ जनावरे किंवा कमाल तीन ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल सहा लहान ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल ३० लहान दुधाळ जनावरे प्रति कुटुंब या मर्यादेत देण्यात येणार आहे. कुक्कुटपालनामध्ये प्रतिपक्षी ५० रुपये याप्रमाणे किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

मच्छीमारांसाठी..

मत्स्य बोटी व जाळ्यांसाठीही मदत जाहीर करण्यात आली असून, बोटीचे अंशत: नुकसान झाले असेल तर १० हजार रुपये, मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेल्या बोटींसाठी २५ हजार, तसेच जाळ्यांच्या नुकसानीपोटी ५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पुरामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमक्या नुकसानीचा अंदाज येईल. मात्र शेतकऱ्यांनाही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय झाला असून, येत्या दोन दिवसांत ही मदत वाटप सुरू होईल. राज्यातील एकूण नुकसानीचा अहवाल आल्यानंतर त्याच्या आधारे केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra government sanctions rs 11500 crore for flood victims zws

ताज्या बातम्या