केरळमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने १७ लाख घरांचे नुकसान झाल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे केरळातील जनतेला आधार देण्यासाठी तेथे घरे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ही घरे बांधण्यासाठी राज्यातील अनेक व्यापारी बांधकामाचे साहित्य आणि आर्थिक मदत देण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यावर जीएसटी आकारू नये, अशी सूचनाही यावेळी आंबेडकर यांनी केली. यावेळी आरोग्य सेनेचे अभिजीत वैद्य देखील उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, केरळ येथील परिस्थिती भीषण असून त्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ही नैसर्गिक आपत्ती शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश दिल्यामुळे तसेच केरळचे बहुतांश नागरिक गोमांस खात असल्याने झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. अशा चर्चा या निरर्थक असून अशा चर्चांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या घटनेवर वैज्ञानिक दृष्टीकोनातून चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

केरळमध्ये १० डॉक्टरांचे पथक जाणार : डॉ. अभिजित वैद्य

केरळ येथील नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट रोजी पुण्यातून आरोग्य सेनेचे १० डॉक्टरांची पथके तेथील नागरिकांच्या सेवेसाठी जाणार आहे, अशी माहिती डॉ. अभिजित वैद्य यांनी दिली.