पूरग्रस्तांना निकषांपेक्षा अधिक अर्थसाह्य?

आज घोषणा; राज्यात २०९ पाऊसबळी

आज घोषणा; राज्यात २०९ पाऊसबळी

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना प्रचलित राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषांपेक्षा अधिक मदत दिली जाणार असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वरिष्ठ मंत्र्यांसमवेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या वेळी प्रचलित निकषांपेक्षा अधिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजूनही काही भागांत पुराचे पाणी असल्याने पंचनामे झालेले नाहीत. प्राथमिक अहवालाच्या आधारे मदतीची घोषणा के ली जाईल.

राज्यात अतिवृष्टीमुळे घरांचे, रस्ते, शेती, दुकानांचे किती नुकसान झाले याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार २०१९च्या शासन निर्णयानुसार सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीतील बळींची संख्या २०९ वर पोहोचली असून, अजूनही आठ लोक बेपत्ता आहेत, तर ५२ लोक जखमी झाले आहेत. पाऊस आणि महापुराचा १३५१ गावांना फटका बसला असून, सुमारे ४ लाख ३४ हजार लोकांचे स्थलांतर झाले आहे. दोन लाख ५१ हजार लोकांची ३०८ निवारा केंद्रात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. कोकण आणि कोल्हापूर- सांगली जिल्ह्य़ातील पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील पाच दिवसांत पुन्हा पावसाचा इशारा वेधशाळेने दिल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra government to announce a special package for flood affected area zws

ताज्या बातम्या