राज्यात रोज आढळणारे करोना रुग्ण आणि सरासरी रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरल्याचं चित्र राज्यात निर्माण झालं आहे. दुसरीकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देखील असल्यामुळे नेमके कोणते निर्बंध शिथिल करावेत आणि कोणत्या बाबींवर कठोर निर्णय घ्यावेत, यावर राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. यातच, आता राज्य सरकारने कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वर्षा निवासस्थानी राज्यातील टास्क फोर्सची आज मुख्यमंत्र्यांसोबच सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील उपहारगृहे, दुकानं आणि अम्युझमेंट पार्कविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच, लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

उपहारगृहांची वेळ वाढणार!

मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळ देखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ही वेळ वाढवली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वेळ वाढवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

अम्युजमेंट पार्कविषयीही चर्चा

दरम्यान, या बैठकीमध्ये अम्युजमेंट पार्कबाबत देखीलचर्चा झाली. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत इतर राईड्ससाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पाण्यातल्या राईड्सबाबत नंतर निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. 

दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.