माध्यमिक शालेय पातळीवर निवडणूक साक्षरता मंच

प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधींची निवड होईल. या प्रतिनिधींमधून स्थापन कार्यकारी समिती मंचचे काम पाहील

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : मतदार नोंदणीत सक्रियता व लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माध्यमिक शालेय पातळीवर निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ या कार्यक्रमाअंतर्गत असा मंच स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्या अनुषंगाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय आज घेतला. इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सहभागासह हा मंच स्थापन करण्याची सूचना आहे. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, त्यांच्यात भावी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याविषयी तसेच मतदान करण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हा मंच कार्य करेल. या मंचात नववी ते बारावीचे सर्व विद्यार्थी सभासद असतील. प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधींची निवड होईल. या प्रतिनिधींमधून स्थापन कार्यकारी समिती मंचचे काम पाहील. मंचचे मार्गदर्शक म्हणून निवडणुकीच्या कार्याचा अनुभव असलेल्या शिक्षकाची नेमणूक करण्याची सूचना आहे. हा शिक्षक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने सुचवलेल्या कार्यपद्धतीशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना विविध संसाधने पुरवण्याची जबाबदारी घेईल.

उपक्रम राबवण्यासाठी  शिक्षकांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे, भावी मतदारांची कौशल्ये अनुभवातून विकसित करण्यासाठी निवडणूक साक्षरता प्रक्रियेचे आयोजन करणे, मुलांना निवडणुकांसाठी मार्गदर्शन करणे, तसेच नवीन संसाधने निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी या मार्गदर्शक असलेल्या नोडल अधिकाऱ्यावर राहणार आहे. २१ ऑक्टोबपर्यंत मंचाची स्थापना करायची असून २६ ऑक्टोबपर्यंत मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी प्रमुखांची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना कळवायची आहे.

उपक्रम असा..

मंचामार्फत संवादी शाळा सहभाग कार्यक्रम, जागतिक मतदारदिनी साक्षरता सप्ताहाचे आयोजन, साक्षरता कार्यक्रमासाठी परिसरातील समुदायाशी संलग्न होणे, रेखांकन व पोस्टर स्पर्धा, युवक संसद, समाज माध्यमांशी संबंधित उपक्रम, साक्षरता शिबिरे, मतदार नोंदणी शिबिरे तसेच निवडणूक आयोगाने निश्चित केलेले उपक्रम आयोजित केले जातील. आगामी वर्षांत निबंध, वक्तृत्व, विडंबन, काव्य, घोषवाक्य, वेबसंवाद व अन्य उपक्रम घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य पातळीवर निवडणूक आयोगातर्फे आयोजित स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra government to set up an electoral literacy forum at secondary school level zws

ताज्या बातम्या