रेतीतस्करी रोखण्यासाठी आता महसूल आणि पोलीस संयुक्त पथके
माणगावच्या तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्यानंतर, आता जिल्हा प्रशासनाने मुजोर रेतीमाफियांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. वाळूतस्करी रोखण्यासाठी आता पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्त पथके स्थापन केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी दिली.

माणगांवचे तहसीलदार महेश सागर यांच्यावर वाळूमाफियांकडून झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड जिल्हा समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून निषेध व्यक्त केला.
त्यानंतर जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांची भेट घेऊन त्याना निवेदन सदर केले. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी व अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करणारे निवेदनाद्वारे करण्यात आली.

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड जिल्हा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, अध्यक्ष तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद प्रकाश खोपकर, सरचिटणीस तथा पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.जी.जाधव, सहसचिव तथा उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वेटकोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. के. इनकर, शिक्षणाधिकारी एच. एन. बढे, महिला प्रतिनिधी तथा लेखाधिकारी दीपाली यादव, प्रसिद्धीप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, तसेच जिल्हय़ातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या हल्ल्याच्या निषेध म्हणून जिल्हय़ातील सर्व अधिकारी आज काळ्या फिती लावून कामकाज करणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी या वेळी सांगितले.

महेश सागर यांच्यावरील झालेल्या हल्ल्याची पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी गंभीर दखल घेतली आहे. यातील तीन आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर या आरोपींवर पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी उगले यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, या हल्ल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने रेतीतस्करांविरोधात सुरू केलेली मोहीम थांबणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उलट ही मोहीम आता अधिक तीव्र केली जाईल. आजवर महसूल विभाग ही कारवाई करीत होता. आता पोलीस आणि महसूल विभाग संयुक्तपणे ही मोहीम राबवतील. रेती उत्खनन करणाऱ्यांचे रॅकेट मोडून काढले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.