पुस्तकांचं गाव भिलार हा देशाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरेल, असा प्रकल्प आहे. याठिकाणी बालकांपासून युवक, पुरुष-महिला अशा सर्वांना वाचता येतील अशी पुस्तकं आहेत. भिलारमधील वाचनसेवेचा आनंद सर्वांनी घ्यायला हवा. आपल्या मुलांना डिजीटल प्राणी बनवू नका, त्यांना पुस्तकी किडे बनवा, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे. त्यांनी नुकतीचं पुस्तकांचं गाव भिलारला भेट दिली. यावेळी त्यांनी भिलार प्रकल्पाचं तोंडभरून कौतुक केलं.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर आणि भिलार गावाची धावती भेट घेतली. राज्यपालांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जोरदार तयारी केली होती. यावेळी गावकऱ्यांचा उत्साह आणि निसर्गरम्य गाव पाहून राज्यपाल भारावून गेले. ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ ते गावात थांबले. यावेळी राज्यपालांनी पुस्तकांच्या गावाचं कार्यालय, शशिकांत भिलारे यांचं चरित्र -आत्मचरित्र दालन आणि प्रशांत भिलारे यांचं शिवकालीन इतिहास दालन आदी पुस्तक दालनांना भेट दिली.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेवक वर्ग, अनेक पुस्तक दालनचालक, ग्रामपंचायतीतील महिला सदस्य, सर्वसामान्य गावकरी अशा अनेकांशी राज्यपालांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांची आस्थेनं चौकशी केली. यावेळी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत भिलार यांच्या वतीनं प्रकल्पाचं बोधचिन्ह असलेला मग, विविध पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचं स्वागत केलं. यावेळी गावचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, वंदना भिलारे, मंगल भिलारे, तेजस्विनी भिलारे, प्रवीण भिलारे, नितीन भिलारे, राजेंद्र भिलारे, तानाजी भिलारे, संजय मोरे, संतोष सावंत, गणपत पारठे, शशिकांत भिलारे आणि राज्य मराठी विकास संस्थेचे उपसंचालक डॉ. श्यामाकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखवला. प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवास्थानी छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, शिवकालीन इतिहासावर अधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. येथेही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली.