१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याचा अर्ज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळला आहे. राज्यपाल भवनातून याबद्दल अधिकृतपणे माहिती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी संजय दत्तच्या शिक्षेला माफी द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. त्याला विविध राजयकी पक्षांनी आणि संघटनांनी तीव्र विरोध केला होता.
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त सध्या ३० दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आहे. संजयला शिक्षामाफी देण्याची मागणी करणारे पत्र मार्कंडेय काटजू यांनी राष्ट्रपतींनाही पाठविले होते. राष्ट्रपती कार्यालयाकडून ते केंद्र सरकारला पाठविण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून अभिप्राय मागविला होता. केंद्राने स्मरणपत्र पाठविल्यावर राज्य सरकारने या प्रकरणी विचार करून संजयच्या सुटकेस याच महिन्यात विरोध केला केला होता. त्याचबरोबर त्याची सुटका न करण्याची शिफारस केली होती.
संजयला बाँबस्फोट खटल्यासारख्या महत्त्वाच्या खटल्यात शिक्षा झाली असून ‘टाडा’ प्रतिबंधित क्षेत्रात अत्याधुनिक रायफल बाळगल्याबद्दल त्याला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. त्याच्या गुन्हय़ाचे गांभीर्य पाहता शिक्षामाफी देणे योग्य ठरणार नाही. तुरुंगात असताना बहुतांश कैद्यांची वर्तणूक चांगलीच असते. त्यासाठी शिक्षामाफी देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.