मुंबई : वर्षभर होणार्या विविध प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची दूरच्या शहरांमध्ये होणारी वणवण आता थांबणार आहे. परीक्षेसाठी पायाभूत सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) २० हजार परीक्षा केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार आहे.
याचा वापर केवळ ‘सीईटी’च्या परीक्षांसाठी न करता ‘राष्ट्रीय परीक्षा संस्थे’च्या (एनटीए), ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) तसेच अन्य संस्थांच्या संगणकाधारित आणि लेखी परीक्षा घेण्यासाठीही करता येईल. परीक्षा घेण्याकरिता लागणार्या पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशी केंद्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतील. त्यातून परीक्षांमधील गैरप्रकार, गैरव्यवस्थापन यांनाही आळा घालणे शक्य होणार आहे. सध्या सीईटी सेलच्या विविध परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर संगणकाधारित परीक्षा केंद्रांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे एनटीएच्या जेईई, नीटसारख्या परीक्षांसह विविध भरती व पात्रता परीक्षांसाठीही केंद्रांची गरज असते.
या सर्व संस्थांच्या गरजा लक्षात घेऊन राज्यस्तरीय परीक्षा केंद्रांचे एक सामायिक जाळे तयार करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगा’च्या (माहेड) बैठकीत सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ही संकल्पना मांडली. ‘मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाऐवजी जिल्हा स्तरावर केंद्रे विकसित करण्याची सूचना केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणे शक्य होईल,’ अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेले आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.
मोठ्या संख्येने उमेदवार असलेल्या परीक्षांमध्ये केंद्रांची कमतरता निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याबाहेर अथवा दूरच्या ठिकाणी जावे लागते. प्रस्तावित कायमस्वरूपी केंद्रांच्या जाळ्यामुळे ही अडचण कमी होईल. सीईटी सेलच्या परीक्षा झाल्यानंतर त्याच केंद्रावर एनटीएच्या विविध संगणकाधारित परीक्षा, एमपीएससीच्या परीक्षा किंवा इतर शासकीय संस्थांच्या परीक्षा घेता येतील. त्यामुळे केंद्रांची उपलब्धता वाढण्याबरोबरच या केंद्रांचा वर्षभर प्रभावी वापर होऊ शकेल.
सर्व सुविधा
सीईटी सेलच्या प्रस्तावानुसार राज्यातील विविध भागांत परीक्षा घेण्यासाठी आवश्यक सुविधा असलेली केंद्रे निश्चित करण्यात येणार आहेत. या केंद्रे वातानुकूलित असतील. तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या शिवाय विद्यार्थ्यांबरोबर आलेल्या पालकांची परीक्षा संपेपर्यंत थांबण्याची सोय करता येईल. त्यामुळे एखाद्या परीक्षेसाठी नव्याने केंद्रे शोधण्याची किंवा प्रत्येक वेळी स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्याची गरज भासणार नाही. त्याकरिता राज्य सरकारच्या ताब्यातील इमारती आणि जमिनींचा वापर करता येईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
‘या संकल्पनेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकर सादर करण्याची सूचना केली आहे. सध्या राज्याच्या महसूल विभागांनुसार राज्यभर ७ हजार २००च्या आसपास परीक्षा केंद्रे आहेत. ही संख्या २० हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. – दिलीप सरदेसाई, आयुक्त सीईटी सेल.
प्रमुख परीक्षांना फायदा
सीईटी सेलकडून वर्षभर ७३ हून अधिक अभ्यासक्रमांकरिता २० च्या प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) घेतल्या जातात. एमपीएससीकडून गट एक, दोन, तीनच्या १० ते १२ प्रमुख स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. एनटीएकडून वर्षभर जेईई (मुख्य), नीट, आयुष अभ्यासक्रम, सीयूईटी , एनसीईटी, नेट, सीमॅट, जीपॅट, एनआयएफटी, आयसीएआर अशा जवळपास २० पात्रता व प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.
