Maharashtra CM Eknath Shinde Updates : काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल रात्री घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ आणि ३ जुलैला अधिवेशन घेण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. नाना पटोले यांनी या पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद भाजपाकडे असेल असं सांगितलं जातं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने ही खेळी केल्याची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेनं भाजपाला धक्का देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. मात्र, यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडींसह राज्यातील प्रत्येक वेगवान घडामोडीची लाईव्ह अपडेट…
Maharashtra Govt Formation Live Updates :एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले.
शिवसेना खासदार संजय राऊत १० तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज त्यांची चौकशी करण्यात आली. दुपारी १२ वाजता ते ईडी कार्यालयात दाखल झाले होते. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं असून त्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती दिली, अशी माहिती राऊत यांनी दिली. गरज पडल्यास ईडीला पुन्हा सहकार्य करू असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून शिंदे गटावर विविध प्रकारचे आरोप केले होते. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आता संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत कधीही लोकांमधून निवडून आले नाहीत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान दीपक केसरकर यांनी केलं आहे. सविस्तर बातमी
शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागील ८ तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. आज दुपारी बारा वाजता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. याप्रकरणी ते पहिल्यांदाच चौकशीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आणखी काही तास ही चौकशी सुरूच राहू शकते, अशीही माहिती मिळत आहे. सविस्तर बातमी
राज्यात भाजपा व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने एकत्रित येत सत्तास्थापन केली आणि अनेक राजकीय अंदाज फोल ठरवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं असताना आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने जोरदार राजकीय टोलेबाजी झाली. या निर्णयाने फडणवीसांचं राजकीय खच्चीकरण झाल्याचा आरोपही झाला. यात आता काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश झालाय. चव्हाण यांनी मुंबई भाजपाचा आनंदोत्सव सुरू असताना फडणवीसांच्या गैरहजेरीवर निशाणा साधला.
अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १९९६मध्ये फक्त १३ दिवस टिकले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणताच पक्ष भाजपला पाठिंबा देण्यास तयार झाला नाही. त्यामुळे तेथेच भाजपला व्यापक अशा आघाडीचे महत्त्व लक्षात आले. पुढे १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात पहिले खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेसी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले. ते पाच वर्ष सुरळीत चालले, अर्थात त्याचे श्रेय वाजपेयींना होते. आघाडीतील घटक पक्षांचे रुसवे-फुगवे त्यांनी सांभाळले. केंद्रात गेली आठ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आघाडीचे सरकार आहे. मात्र भाजपला पूर्ण बहुमत असल्याने तो मित्र पक्षांवर अवलंबून नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही शिवसेना, अकाली दलासारखे जुने सहकारी नाहीत. संयुक्त जनता दल आणि अण्णा द्रमुक हेच दोन मोठे पक्ष या आघाडीत आहेत. मात्र विचारसरणीच्या मुद्द्यावर ते केव्हाही बाहेर पडू शकतात. भाजपचे मित्र पक्षांशी नेमके संबंध कसे आहेत, भविष्यात नवीन मित्र जोडण्याच्या शक्यता किती आणि विचारांशी जवळीक असूनदेखील जुने मित्र का दुरावले, याचा हा धांडोळा.
सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे.
एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगले काम केले आहे.
कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा.
गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे
धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी.
मी आणि उपमुख्यमंत्री 24 तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
२७५ मि.मी. पाऊस एका दिवसात पडूनही महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई तसेच पाणी तुंबणार नाही यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही व वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची गेल्या आठ तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. दुपारी १२ वाजता संजय राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले होते. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. राज्यात चाललेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ईडीकडे वेळ मागितला होता.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही वर्षांत भाजपचे कर्तबगार राज्यनेते म्हणून उदयास आले. उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र हे मोठे आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य. परंतु विचारधारांचा विचार केल्यास महाराष्ट्र हे कितीतरी अधिक गुंतागुंतीचे ठरते. निव्वळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येथे निवडणूक लढता आणि जिंकता येत नाही. फडणवीस यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अडीच वर्षे विरोधी पक्षात राहून राज्यातील बलवान अशा शिवसेनेमध्ये मोठी फूट घडवून आणली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका संख्याबळ नसूनही जिंकल्या. तरीदेखील त्यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखालचे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास केंद्रीय नेतृत्वाने भाग पाडले. एकीकडे योगी आदित्यनाथ यांच्यावर विशेष मर्जी आणि दुसरीकडे पक्षशिस्त आणि धोरणांच्या नावाखाली फडणवीसांवर अन्याय, या विरोधाभासाचे हे विश्लेषण.
मागील काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रलंबित आहे. संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याचं कारण सांगून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास नकार दिला होता. महाविकास आघाडी सरकारच्या शिस्तमंडळाने राज्यपालांना भेटून अनेकदा विनंती केली होती. पण राज्यपालांनी निवडणूक घेण्यास परवानगी दिली नव्हती. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. सविस्तर बातमी
“एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल असे जाहीर करून भाजपा प्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे. पर्यावरणाचा विचार करून आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचे प्रस्तावित केला आहे. परंतु, पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे,” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (४ जुलै) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून सोमवारपासून पुढील आठ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलै पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा कळीचा ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना १२ आमदारांची यादी देण्यात आली होती. ही यादी देऊन जवळपास पावणे दोन वर्षे उलटली, तरीही राज्यपालांकडून या यादीला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला होता. सविस्तर बातमी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची आरे कारशेड बाबतची विनंती फेटाळून लावली आहे. “यासंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊच. उद्धव ठाकरेंचा पूर्ण मान राखून मला असं वाटतंय की कारशेडच्या संदर्भात मुंबईकरांचं हित हेच आहे की जिथे कारशेड २५ टक्के तयार झालंय, तिथेच ते १०० टक्के तयार व्हावं, कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
कल्याण आणि बदलापूर या शहरांना जोडणारा राज्यमार्ग पुन्हा एकदा तुंबला. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यमार्गावरील अंबरनाथ शहरातील पश्चिमेचा मोठा भाग पाण्याखाली गेला. या राज्यमार्गावर असलेल्या ग्लोब बिजनेस पार्क ते विमको नाका या परिसरात एक फुटापर्यंत पाणी साचले होते.
“बाळा आम्हीही तुझ्याकडे येत आहे” अशी चिठ्ठी लिहून तरूण माता-पित्यांनी एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आटपाडी तालुययातील राजेवाडी येथे गुरूवारी रात्री उघडकीस आला. मृत पती-पत्नीच्या दोन वर्षाच्या मुलीचा चारच दिवसापुर्वी मृत्यू झाला होता. हे दु:ख सहन झाल्याने दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. यानंतर आता महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष संपल्याची चिन्हे दिसत आहेत. शिदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्याप २४ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. सविस्तर बातमी
मागील जवळपास दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्षाचा शेवट नाट्यमयरित्या झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी होण्यापूर्वी काही तास आधीपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. सविस्तर बातमी
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. नावाबाबत चर्चा सुरू आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
मागील दोन वर्षापासून शिंदे पिता-पुत्रांबरोबर धुसफूस सुरू असलेल्या शीळ येथील निवासी सुभाष भोईर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. कल्याण लोकसभेच्या कळवा ते अंबरनाथ दरम्यान शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात याच भागातील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भागातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्यात शिवसेना गट आणि भाजपाने एकत्रित येऊन नवे युतीचे सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष केला. ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांनी नवे सरकार स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद हुकल्याची खंत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. वाचा सविस्तर बातमी…
दुचाकीस्वार दाम्पत्याला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. चोरट्यांनी दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार केले. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
मुंबई : मुंबईत दैनंदिन करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येसह बाधितांच्या प्रमाणात घट होत असून करोनाची चौथी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. परिणामी, उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेखही उताराला लागला आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्यामध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रामध्ये येणार असल्याची घोषणा केलीय. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारुन सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले आणि सध्या गोव्यात असणारे आमदार कधी परत आहेत याबद्दलची माहिती दिली.
आरेचा निर्णय त्यांनी बदलला याचं मला दु:ख झालं असल्याचं सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा राग मुंबईवर काढू नका असं आवाहन नव्या सरकारला केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला आवाहन केलं. दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये उद्धव ठाकरेंनी आरेमधील झाडं मेट्रोसाठी तोडली असतील तरी तिथे बिबटे आहेत असा उल्लेख केला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी उल्लेख केल्याप्रमाणे मागील काही दिवसांमध्ये अनेकदा या ठिकाणी बिबटे आढळून आले आहेत. त्यापैकी एका प्रसंगी तर आरेमधील म्हशींच्या गोठ्यातच बिबट्या शिरल्याचा व्हिडीओ समोर आला होता. उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्याचं समर्थन करणारा हा व्हिडीओ आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नसल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर हेच सरकार आलं असतं याचा पुनरुच्चार केला. तसंच आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसेल असा टोला लगावला.
सत्तेवर आल्यानंतर आरे कारशेडसंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरेमधून कांजूरमार्गला नेलेलं कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून पर्यावरणवाद्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला आवाहन केलं आहे.
मागील दोन वर्षापासून शिंदे पिता-पुत्रांबरोबर धुसफूस सुरू असलेल्या शीळ येथील निवासी सुभाष भोईर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. कल्याण लोकसभेच्या कळवा ते अंबरनाथ दरम्यान शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात याच भागातील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भागातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोकण किनारपट्टीवर मुंबईसह सर्वच शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातही गुरूवारी पाऊस पडला मात्र त्याचे प्रमाण कमीच राहिले. त्यामुळे जिल्ह्यात अवग्या २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात संपूर्ण महिन्यात सरासरीच्या अवघे ३७ टक्के पाऊस पडला. गेल्या पाच दिवसात पावसाचे प्रमाण वाढले मात्र ते अत्यल्पच राहिले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. वाचा सविस्तर बातमी…
लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, यांनी पुढे आलं पाहिजे लोकशाही वाचवायला कारण लोकांचा विश्वास उडत चालला आहे. गुप्त मतदानाची पद्धत आहे, पण निदान ज्यांनी मतदान केलेलं आहे त्याला तरी कळलं पाहिजे की कोणाला मतदान केलं आहे ते, मतदाराचाही लोकशाही वरील विश्वास रहाणार नाही. मतदाराने मत देऊन निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलण्याचा अधिकार पाहिजे.
माझी हात जोडून विनंती आहे की माझा राग मुंबईकरांवर काढू नये. आरेचा जो आग्रह आहे तो रेटू नका. कांजूरमार्ग कारशेडबाबत निर्णय घ्या. आता दोन्ही ठिकाणी तुमचे सरकार आहे.
ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केलं ज्याने सरकार स्थापन केलं, त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच तर मी सांगत होतो अडीच वर्षांपूर्वी, जे आज झालं तेच आधी सन्मानाने झालं असतं, त्या वेळेला नकार देऊन हे आत्ता असं का केलं ? तेव्हा शिवसेना म्हणून अधिकृत तुमच्या बरोबर होतो. मला का मुख्यमंत्री बनायला लावलं ? महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता.
राज्यात सत्तांतर होताच नव्या सरकारने मेट्रो ३ ची (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत ‘आरे वाचवा’ (सेव्ह आरे) चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने कितीही प्रयत्न करू दे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका या मंडळींनी घेतली आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनावर दाखल झाले आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते पुढील रणनीती ठरवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) बोरिवली ते विरार दरम्यानच्या पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या मार्गिकेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत पाचवी – सहावी मार्गिका सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. तसे झाल्यास मेल, एक्स्प्रेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. परिणामी, भविष्यात चर्चगेट – विरारदरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढतील आणि जलद लोकल प्रवास अधिक सुकर होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर बातमी…
राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाटय़ाच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णा लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील नेत्यांपासून सर्वांनी दोघांना शुभेच्छा दिला. उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकामागोमाग एक धक्के देत राज्यात सत्तास्थापना झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर दोघांनीही तातडीने कॅबिनेट बैठक घेत कामांला सुरुवात केली. कॅबिनेट बैठकीनंतर मंत्रालयातील पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यानंतर कुणीही बोलायचं नसतं,” असं सूचक वक्तव्य केलं. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
आजनसकाळपासून पावसाने ताल धरल्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिट विलंबाने धावत आहेत. पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिमंडळ सचिवालयाने पत्रक जारी केलं असून त्यानुसार ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी ही निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी २९ जूनच्या रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने सरकार अल्पमतात आलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पदाचा त्याग केला. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान भाजपा नेते मोहित कम्बोज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रामध्ये नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या घडामोडी, नवीन सरकारबरोबरच केंद्रीय यंत्रणांसदंर्भात भाष्य करताना एक मोठा खुलासा केलाय. आपल्यचाला प्राप्तीकरासंदर्भातील नोटीस आल्याचं पवारांनी गुरुवारी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांनी केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना ही माहिती दिलीय.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे मुंबईत ११.४५ च्या सुमारास ईडी कार्यालयात पोहचले आहेत. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. राज्यात चाललेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ईडीकडे वेळ मागितला होता.

ऑनलाइन मोबाईल संच खरेदी केल्यानंतर चोरट्यांनी तरुणीला मोबाईल ऐवजी साबणाची वडी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आता नवे मंत्री कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या पार्श्वभूमीवर वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नावाची चर्चा वेगळ्याच कारणाने होत आहे. भाजपा नेते व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांपूर्वी केलेले जाहीर भाकीत हे या मागचे कारण आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबईमध्ये कालपासून (गुरूवार) मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात आता पुढील चार ते पाच तासांत देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत जोरदार पावसाची वर्तवण्यात आली आहे. कालपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचून मुंबईकरांना फटका बसला. गेल्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पूर्वसंध्येपासून दमदार हजेरी लावत मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडविली. वाचा सविस्तर बातमी…
शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे. सर्वांनी ती व्यक्तही केली आहे. पण उद्धव ठाकरेंची आजुबाजूला असणारे लोक दिशाभूल करत आहेत. तोंडघशी पडण्याचा प्रकार का करत आहात? शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे हे स्वीकारलं पाहिजे असा सल्ला एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
औरंगाबाद या शहराच्या नावाचा ३८६ वर्षांचा इतिहास बदलविण्याचा महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेला दुसरा प्रस्ताव आता पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे. १९९५ साली नामांतराबाबत काढलेली अधिसूचना २००१ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारने रद्द केली होती. या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी झाल्यानंतर हे प्रकरण निकाली काढले होते. त्यामुळे अल्पमतामधील सरकारने नव्याने औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे करण्याचा निर्णय ही कृती सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याने त्यास विरोध केला जाईल, असे औरंगाबाद- उस्मानाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्यावतीने गुरुवारी सांगण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर होत शिवसेनेचे नेते व साताऱ्याचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे दरे तांब (ता. महाबळेश्वर) गावचे सामान्य कुटुंबातील सुपुत्र असल्याने सातारकरांना याचा वेगळा अभिमान आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने दरे तर्फ तांब गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. फटाके आणि ढोल- ताशांच्या गजरात या छोट्याशा गावात एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र सरकार स्थापनेचे लाइव्ह अपडेट