मुंबई: राज्यातील प्रमुख सहा रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याचे काम गुजरातमधील शहा बंधूंच्या सेवादान आरोग्य फाऊंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी या संस्थेला केवळ एक रुपया भाडेपट्ट्याने कोट्यावधी रुपयांची जागा आंदण दिली जाणार आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने याविषयीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय व वैद्यकीय महाविद्यालये, पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मुंबईतील सर जे. जे. समूह रुग्णालय, कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात या अहमदाबादस्थित हर्षद शहा आणि मोहित शहा यांच्या सेवादान आरोग्य फाऊंडेशनला धर्मशाळा उभारण्यासाठी वार्षिक एक रुपया नाममात्र दराने ४९ वर्षांसाठी ही जागा देण्यात आली आहे. धर्मशाळांमधील निवास आणि इतर सुविधा केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच उपलब्ध राहतील. जागेचा अन्य कोणत्याही व्यावसायिक किंवा खासगी कारणासाठी वापर करता येणार नाही, अशी स्पष्ट अट सरकारने घातली आहे.

बांधकामाचा खर्च संस्थेवर

धर्मशाळांचे बांधकाम, वित्तपुरवठा, सुसज्जीकरण, संचालन, देखभाल, स्वच्छता, सुरक्षा, मनुष्यबळ, विमा आणि आवश्यक परवानग्यांची जबाबदारी पूर्णपणे सेवादान आरोग्य फाउंडेशनवर राहणार आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत धर्मशाळांचे बांधकाम पूर्ण करून त्या सुरू करणे संस्थेला बंधनकारक राहील. प्रत्येक प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रकल्पाची प्रगती, सुविधा, शुल्क, तक्रार निवारण, अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षा आणि शासनाच्या अटींचे पालन यावर ही समिती नियमित देखरेख ठेवणार आहे. कराराची मुदत संपल्यानंतर किंवा करार समाप्त झाल्यास धर्मशाळेची इमारत, पायाभूत सुविधा आणि संबंधित मालमत्ता कोणताही मोबदला न देता सरकारकडे हस्तांतरित करण्याची अट घालण्यात आली आहे.

अन्य राज्यांतही जागा

याआधी या संस्थेला गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड व राजस्थान या भाजपशासित राज्यांत विविध शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्माशाळा, विश्रांतीगृहे उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.