मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. या दोन्ही स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ५३२ कोटी ५१ लाख रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आता संभाजी महाराजांच्या समाधिस्थळाचे काम मार्गी लागणार आहे.

महसूल विभागाने यासंदर्भात शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, के.ई.एम. रुग्णालयाची वढू बुद्रुक येथील गट नं. ४४७ आणि ४४८ मधील एकूण ०.८७ हेक्टर २० आर जमीन छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या कामासाठी तात्काळ हस्तांतरित केली जाणार आहे. या बदल्यात, शासनाने के.ई.एम. रुग्णालयाला कोंढापुरी (ता. शिरूर) येथील गट नं. ६५५ मधील ०.८१ आर जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणून कब्जा हक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. कोंढापुरी येथील जमीन रुग्णालयाला ‘विशेष बाब’ म्हणून महसूलमुक्त आणि भोगवटामूल्यरहित  उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जमिनीचा वापर केवळ मंजूर वैद्यकीय प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असून तीन वर्षांच्या आत तिथे काम सुरू करावे लागेल.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा, ही सर्वांचीच अनेक वर्षांची मागणी होती. या निर्णयामुळे समाधीस्थळाच्या नियोजित विकास आराखड्याला मोठी गती मिळणार आहे. हे समाधीस्थळ छत्रपती संभाजीराजे यांच्या त्याग व बलिदानाचे  प्रतीक आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.

वढू बुद्रुक येथील नियोजित विकासकामे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे अत्याधुनिक संग्रहालय आणि ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध ग्रंथालय उभारले जाणार आहे. ८२ आसन क्षमतेचे एक अत्याधुनिक सभागृह असेल, जिथे १०-डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रफित दाखवली जाईल. स्मारकाच्या परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण ‘अदृश्य शिल्प'(इन्व्हिझिबल स्कल्पचर) उभारले जाणार आहे. भीमा नदीच्या काठी १२० मीटर लांबीचा घाट बांधला जाणार आहे.