अलिबाग : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांवर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गडकिल्ले महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ६० लाख रुपयांच्या खर्चास वित्तीय मान्यता देण्यात आली असून प्रत्येक किल्ल्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या रायगड, शिवनेरी, खांदेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जिंजी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग आणि राजगड या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या ऐतिहासिक वारशाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि किल्ल्यांचा इतिहास अधिकाधिक नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गडकिल्ले महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. महोत्सवांमध्ये स्थानिक लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक वारशावर आधारित उपक्रम तसेच किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील रायगड आणि खांदेरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग या किल्ल्यांवर विशेष सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहेत. या उपक्रमातून राज्याच्या समृद्ध दुर्गवैभवाची ओळख देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून वारसा पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.