मुंबई: देशातील वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) वसुली ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये वाढली असली तरी महाराष्ट्रात वसुली घटली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जवळपास ७०० कोटींनी वसुली राज्यात कमी झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये राज्यात १८,६५६ कोटींची वस्तू आणि सेवा कराची वसुली झाली. त्याआधी ऑक्टोबरमध्ये १९,३५५ कोटींची वसुली झाली होती. ऑक्टोबरच्या तुलनेत राज्यातील वसुलीत ६९९ कोटींची घट झाली. दिवाळी व सणासुदीच्या काळात वसुली वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात वसुली घटली आहे. राज्याचे अर्थचक्र अद्यापही गतिमान झालेले नाही हेच आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे   म्हणणे आहे. ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात टी. व्ही., फ्रीज आदी गृहपयोगी वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली होती. त्यातून वसुली वाढली होती, असे निरीक्षण राज्य शासनातील उच्चपदस्थांनी नोंदविले. 

चालू आर्थिक वर्षांत एप्रिलमध्ये सर्वाधिक २२ हजार कोटींची वसुली झाली होती. छोटय़ा व्यापाऱ्यांकडून तिमाही विवरणपत्र सादर केली जातात. यामुळे एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांत वाढ दिसली होती याकडेही लक्ष वेधण्यात येते. नोव्हेंबरमध्ये वसुली वाढेल अशी अपेक्षा होती, पण तेवढी वसुली झालेली नाही.

चालू आर्थिक वर्षांत एप्रिल २२,०१२ कोटी, मे १३,३९९ कोटी, जून १३,७२१ कोटी, जुलै १८,८९९ कोटी, ऑगस्ट १५,१७५ कोटी, सप्टेंबर १६,५८४, ऑक्टोबर १९,३५५ कोटींची वसुली झाली आहे.

 देशात या कराच्या वसुलीत महाराष्ट्र कायमच आघाडीवर आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात ९५६९ कोटी, कर्नाटक ९,०४८ कोटी, तमिळनाडू ७,७९५ कोटी, उत्तर प्रदेश ६६३६ कोटी तर हरयाणात ६,०१६ कोटींची वसुली झाली.