जालना येथे राज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय

ओटा बांधतानाच त्यामध्ये जलवाहिनी, विद्युत वाहिन्या आणि सांडपाणी व मलनिस्सारणाची वाहिनी टाकण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

जालना : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येथे उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या मेडिकॅब रुग्णालयाचे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. अशाच प्रकारची रुग्णालये महाराष्ट्रात बारामती आणि अमरावती येथेही उभारण्यात येत असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

मास्टरकार्ड कंपनीच्या अर्थसहाय्याने आणि अमेरिका-इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्यातून या रुग्णालयाची उभारणी एका महिन्यात करण्यात आली आहे. मास्टरकार्ड कंपनीच्या माध्यमातून देशभरात अशी अनेक रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यामध्ये दोन हजार खाटांची सुविधा उपलब्ध असणार आहे. बारामती आणि अमरावती येथेही १०० खाटांची सुविधा असणार आहे. जालना येथे उद्घाटन झालेले अशा प्रकारचे हे पहिलेच रुग्णालय आहे. करोना उपचारासाठी सर्व प्रकारच्या सुविधा या रुग्णालयात आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

हे रुग्णालय साधारणत:  २५ वर्षे राहू शकते. त्यामुळे करोना संसर्ग संपूर्ण आटोक्यात आल्यावर या रुग्णालयाचा उपयोग शासनाच्या अन्य आरोग्यसेवांसाठी होऊ शकणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात ३० हजार चौरस फूट जागेवर हे रुग्णालय उभारण्यात आले असून त्यासाठी २१ हजार चौरस फुटाचा ओटा तयार करण्यात आला आहे. ओटा बांधतानाच त्यामध्ये जलवाहिनी, विद्युत वाहिन्या आणि सांडपाणी व मलनिस्सारणाची वाहिनी टाकण्यात आली आहे. तपासणी कक्ष, निरीक्षण कक्ष, डॉक्टर कक्ष आणि अलगीकरण कक्ष अशा चार विभागांमध्ये हे रुग्णालय आहे. अत्याधुनिक अतिदक्षता विभागातील आठ खाटा आणि विलगीकरणाच्या ९२ खाटा या रुग्णालयात आहे. प्राणवायू आणि अन्य आवश्यक सुविधा या रुग्णालयात आहेत. आमदार कैलास गोरंटय़ाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांची भाषणे यावेळी झाली. जि. प. अध्यक्ष उत्तमराव राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती यावेळी होती.

पोर्टेबल हॉस्पिटलची संकल्पना

भारतीय प्रौद्योगिक संस्थान अर्थात आय.आय.टी. मद्रास आणि स्टार्टअप मॉडय़ुल्स हाऊसिंग यांच्या संकल्पनेतून ‘मेडिकॅब’ रुग्णालय आकारास आले आहे. अशा प्रकारच्या पोर्टेबल हॉस्पिटलची उभारणी पहिल्यांदा केरळमधील वायनाड येथे करण्यात आली. करोना संसर्गाच्या काळात ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार अत्यंत कमी वेळेत मेडिकॅबची उभारणी करण्याच्या उद्देशातून ही संकल्पना आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra health minister launches portable hospital in jalna zws