राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर तानाजी सावंत यांच्या नावे एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये तानाजी सावंत यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बद करा असा सल्ला दिल्याचा दावा आहे. तसंच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरुन तानाजी संताप संतापले असून टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. तुम्हाला अंगठाछाप मंत्री दिसतो का? असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले तानाजी सावंत?

“हा सगळा मूर्खपणा आहे. मीडियाला किंवा इतरांना हे नवं सरकार आल्याचं पचत नाही आहे. तुम्हाला सर्वांना माझं शिक्षण माहिती आहे ना? उगाच ११-१२ वीचा पोरगा म्हणून ही दांडकी (मीडियाचे बूम) घेऊन फिरत नाही आहे. मी उच्चशिक्षित आहे. एकदा मी किती संस्था चालवतो, किती कारखाने चालवतो, किती कर्मचारी आहेत, किती दर्जेदार आहेत याची माहिती घ्या. मी काय तुम्हाला अंगठाछाप मंत्री वाटलो का?,” अशी विचारणा तानाजी सावंत यांनी केली आहे.

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“म्हणजे मला कळतच नाही, मी इतका वेडा आहे का? मी कुठे बोललो हे दाखवून द्या. हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायची नाही असं म्हणालो असेल तर आत्ता राजीनामा देऊन टाकेन,” असं जाहीर आव्हानही त्यांनी दिलं.

व्हायरल पोस्टमध्ये काय दावा होत आहे –

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकतीच ससून रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांचीही भेट घेतली. तानाजी सावंत यांनी यावेळी डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारले. रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, हाफकिनकडून वेळेत औषधं मिळत नसल्याची तक्रार डॉक्टरांनी केली. त्यावर तानाजी सावंत यांनी, ‘तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते बंद करा’ असं म्हटलं. यानंतर पीएने त्यांना हाफकीन शासकीय संस्था असल्याचं सांगत सारवासारव केली असा दावा आहे. स्थानिक वृत्तपत्रानेही यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली आहे.

जिल्हाधिकारी आणि खासगी सचिवामधील वादावर भाष्य

जिल्हाधिकारी आणि खासगी सचिवामध्ये झालेल्या वादावर बोलताना ते म्हणाले “अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असून, ती बदलेल. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याची दखल घेतील. मी माझ्या अधिकाराखाली एखाद्या गोष्टीची माहिती काढण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांना वाईट वाटण्याचं कारण नाही. तो काही आरटीआय कार्यकर्ता नाही”.

“आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी काही बाबींवर स्थगिती दिली होती. मग ही स्थगिती दिल्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली की नाही हे पाहणं माझं कर्तव्य आहे. त्यासाठीच मी माझे अधिकारी नेमले. हे जिल्हाधिकाऱ्यांना मान्य नव्हतं,” असा दावा तानाजी सावंत यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra health minister tanaji sawant on his statement over haffkine sgy
First published on: 06-09-2022 at 09:27 IST