मुंबई : देशातील उष्णता पाच पटीने वाढली आहे. वाढते औद्योगिकरण, पायाभूत सुविद्या, मोठे रस्ते, उड्डाणपूल, सागरी मार्ग या प्रकल्पामुळे तापमान वाढीचा सर्वाधिक धोका राज्याला आहे. राज्यात उष्णता वाढीचा प्रमाण पाच पटाने वाढले आहे. दुष्काळाचे प्रमाण तीनपट झाले आहे. पूराची शक्यता चार पटीने वाढली आहे. पर्यावरणाकडे इतके वर्षे, दशके, शतके लक्ष दिले नाही ते लक्ष देण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल या विषयावर मुंडे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना विधानसभेत उत्तरे दिली. वातावरणीय बदल हा विषय अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा आहे. हजारो वर्षे कोळसा, पेट्रोल, डिझेल, जीवाश्म इंधन हे निर्सगाकडून घेतले. पण आपण निर्सगाला काही परत देऊ शकलो नाही.

जग इंधनावर लक्ष ठेवून आहे. इंधनावरुन सध्या जग पेटलेले आहे. आतापर्यंत मानवाने केलेली वृक्षतोड ही अक्षम्य आहे. वातावरणात मोठया प्रमाणात होणारे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन थांबण्याची गरज आहे. त्यासाठी वृक्षलागवड हाच एक पर्याय असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३०० कोटी वृक्ष लावण्याचे जाहीर केले आहे.

वातावरणाची सुरक्षा करण्याचे दायित्व सर्वांकडे आहे. हे दायित्व अगोदरच्या पिढीकडून आपल्याकडे आले आहे. वातावरणातील बदलामुळे पुढील पिढीचा श्वास आपण सर्वजण कर्ज म्हणून घेत आहोत. मानव जातीच्या इतिहासात २०२४ हे सर्वाधिक उष्ण वर्षे होते. जागतिक तापमानात सरासरी १.२ टक्के वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील मोठया प्रकल्पामुळे तापमान वाढीचा सर्वाधिक धोका महाराष्ट्राला आहे. राज्यात ४३ अमृत शहरे आहेत. त्यांच्यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. वायू, पाणी, माती यांच्या प्रदुषणावर लक्ष ठेवले जात आहे. नद्यांच्या पुर्नरज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर ठेवला जाणार आहे.

जल, जमीन, वायू, आकाश, अग्नी या पंचहाभूतांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. शहरात कमी प्रदुषण करण्यासाठी उपापयोजना केल्या जात आहे. पुढील पिढीसाठी धन, धान्य, संपत्ती न ठेवता ऑक्सीजन, नायट्रोजन ठेवावे लागणार आहे, असे भावनिक आवाहन मुंढे यांनी केले.