मुंबई : अवैध व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलचे परवाने रद्द केले जातील. ज्या भागातील हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू आहेत, त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

दादाराव केचे यांनी या बाबत प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री विधान परिषदेत उपस्थितीत असतानाच केचे यांनी पोलिस प्रशासनाचे वाभाडे काढले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात अवैध व्यवसाय वाढले आहेत. शहरातील विविध हॉटेलवर गरीब मुलींना आमिष दाखवून त्यांना देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. रहदारी असलेल्या रस्त्यांवर उभा राहून मुली, महिला देहविक्री व्यवसाय करीत असल्यामुळे कायदा – सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलिसांना सर्वकाही माहित असूनही कोणतीही कारवाई केला जात नाही. पोलिस बघ्याची भूमिका घेतात, असा आरोप केला.

आर्वी तालुक्यातील सर्व हॉटेलची चौकशी केली जाईल. अवैध व्यवसाय चालणाऱ्या हॉटेलचे परवाने रद्द केले जातील. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलवर अवैध व्यवसाय सुरू आहेत, त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती भोयर यांनी दिली.