सोनू सूद यांचं कार्य चांगल; अनिल देशमुख यांनी केली स्तुती

गृहमंत्र्यांकडून सोनू सूदचं अभिनंदन

शिवसेना नेते संजय राऊत यांचं विधान मी पाहिलं नाही. परंतु सोनू सूद करत असलेलं कार्य चांगलं असल्याचं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. सोनू सुद याच्या कार्यावर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देशमुख यांनी त्याच्या कामाची स्तुती केली.

“संजय राऊत यांचं विधान मी पाहिलं नाही. परंतु करोनाविरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. सोनू सूद यांचं कार्य चांगलं आहे. त्यांच मी अभिनंदन करतो,” असं म्हणत देशमुख यांनी सोनू सूदच्या कार्याची स्तुती केली. लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक जणं पुढे येत होती. केंद्र सरकारने मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची सोय केली. याचसोबत राज्य सरकारही या कामगारांसाठी विशेष बस गाड्या चालवत होतं. मुंबईत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या कामगारांना घरी पाठवण्याची जबाबदारी उचलली. गेल्या काही दिवसांत सोनूने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून या कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवलं. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली.

काय म्हणाले होते राऊत?

सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? ”कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते,” अशी टीका राऊत यांनी केली होती.

सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावर उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता ? त्याचा खुलासा लवकरच होईल, असं राऊत म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra home minister praises actor sonu sood migrant workers help shiv sena sanjay raut jud

ताज्या बातम्या